युक्रेन युद्धावर रशिया-अमेरिकेत चर्चेमुळे युरोपची चिंता वाढली, नेमकं कारण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सध्या रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे नाव घेत नसून शांतता चर्चेसाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अमेरिका आणि रशियामध्ये युक्रेन युद्धाच्या संदर्भात सौदी अरेबियात बैठक सुरु होणार आहे. ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, मात्र या बैठकीमुळे युरोपमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सध्या सौदी अरेबियात या बैठकीचे आयोजन करण्यत आले आहे.
युरोपला चर्चेतून वगळले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात चर्चा होईल. सध्या चर्चेचा पहिला टप्पा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्क रूबियो यांच्या स्तरावर होत आहे. मात्र, युरोपमध्ये या चर्चेबद्दल चिंतेचे वातावरण दिसत आहे, कारण युरोपला या बैठकीतून वगळण्यात आले आहे.
या युरोपीय देशांवर रशिया कब्जा करेल?
युरोपने त्यांना चर्चेतून वगळल्याने भीती व्यक्त केली आहे की, जर या चर्चेमधून शांती करार झाला आणि रशियावर कोणत्याही कडक निर्बंध लागू करण्यात आले नाहीत, तर रशिया पुन्हा आपल्या विस्तारवादी धोरणांना पुढे नेऊ शकतो. विशेषतः पोलंड, बाल्टिक देश आणि जर्मनीला रशियाकडून भविष्यातील आक्रमणाची भीती वाटत आहे. त्यामुळे युरोप युद्धाचा शेवट रशियाच्या स्पष्ट पराभवाने व्हावा, अशी भूमिका घेत आहे.
ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणामुळे युरोप अधिक सावध झाला आहे. ट्रम्प यांना नेहमीच वाटले आहे की, युरोपियन संघर्षांमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप करणे आणि त्यावर अमेरिकी करदात्यांचा पैसा खर्च करणे निरर्थक आहे. ट्रम्प या युद्धाला ‘युरोपीय समस्या’ मानतात आणि युरोपलाच हा प्रश्न सोडवावा लागेल, असे त्यांचे मत आहे.
मात्र, युरोपसाठी हा फक्त एक स्थानिक प्रश्न नसून त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. ट्रम्प यांनी जर रशियाशी शांती करार केला, तर अमेरिका युरोपला धोका देईल असे म्हटले जात आहे आणि त्याच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
युरोपुढील समस्या
या युद्धामुळे युरोपला ऊर्जा संकट, वाढती महागाई आणि वाढत्या लष्करी खर्चाचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, अमेरिका कमी किमतींत गॅसची विक्री करून नफा कमावत आहे. युरोपला वाटते की जर युद्ध अचानक संपले, तर त्याने केलेला आर्थिक बळी व्यर्थ जाईल आणि अमेरिका त्याचा फायदा उचलेल.
ट्रम्प यांच्या पूर्वीच्या अनिश्चित धोरणांमुळे युरोपमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचा अभाव आहे. 2018 मध्ये हेलसिंकी येथे पुतिन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमुळे वाद निर्माण झाले होते. आता पुन्हा अशी शांती वार्ता झाल्यास युरोपच्या सुरक्षेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे युरोपची चिंता अधिकच वाढली आहे.