अमेरिकेत पॅलेस्टिनी समजून इस्त्रायली नागरिकांवर गोळीबार; नेमकं प्रकरण काय? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या फ्लोरिडामधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. एका व्यक्तीने संशयाच्या आधारावर दोन व्यक्तींवर गोळीबार केला. त्याला वाटले की, ते पॅलेस्टिनी आहेत, मात्र, त्याने प्रत्यक्षात इस्त्रायली नागरिकांवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेमुळे अमेरिकेतील वाढत्या धार्मिक आणि द्वेषाच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे अमेरिका-इस्त्रायल संबंध बिघडणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतो.
आरोपीला अटक
मियाम बीच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका 27 वर्षीय मार्डेचाई ब्राफमॅन या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ब्राफमॅनने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की त्याला वाटले की हे लोक पॅलस्टिनी आहेत, म्हणूनच त्याने गोळीबार केला.
कशी घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राफमॅन मियामी बीच येथून ट्रक चालवत जात असताना रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या दोन व्यक्तींवर त्याची नजर गेली. त्याने तत्काळ ट्रक थांबवला आणि उतरुन कोणत्याही कारणाशिवाय दोन व्यक्तींवर गोळ्या झाड्याल्या. या गोळीबारात एका व्यक्तीच्या खांद्याला तर दुसऱ्याच्या हाताला गोळी लागली. सुदैवाने दोघेही वाचले. मात्र, तपासादरम्यान या दोन व्यक्ती इस्त्रायली असल्याचे आढळून आले.
अमेरिकत पुन्हा धार्मिक हिंसाचार
या घटनेमुळे अमेरिकेत वाढत्या धार्मिक आणि जातीय हिंसेच्या घटना पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गाझा युद्धानंतर अमेरिकेत मुस्लिम, पॅलेस्टिनी आणि ज्यू विरोधी हिंसेच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यापूर्वी एका घटनेत टेक्सासमध्ये एका पॅलेस्टिनी-अमेरिकन मुलाची पाण्यात बुडवून हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला होता.
याशिवाय, इलिनॉय येथे एका सहा वर्षीय पॅलेस्टिनी-अमेरिकन मुलाची चाकूने हत्या करण्यात आली होती. मिशिगन, मॅरीलँड आणि शिकागो येथेही ज्यू समुदायावर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.
ट्रम्प प्रशासनाकडे कारवाईची मागणी
अमेरिकेत अशा प्रकारच्या हिंसक घटनांमध्ये वाढ होणे गंभीर चिंतेचे कारण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. धार्मिक जातीय द्वेषामुळे अनेक निर्दोष लोकांचा बळी जात आहे. या घटना मानवतेच्या विरोधात असून याला आळा घालण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कडक कारवाई केली पाहिजे, अशा मागणी केली जात आहे. जागतिक स्तरावर या घटनांना विरोध केला जात आहे.