US Deportation Drive: अवैध प्रवाशांच्या हद्दपारीच्या ट्रम्प यांच्या योजनेला 'या' देशांनीही दिला दुजोरा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपारीच्या निर्णयाने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाईत आतापर्यंत, कॅनडा, मॅक्सिको, आणि भारतातील अनेक प्रवाशांना परत मायदेशी पाठवण्यात आले आहे. आता ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली कोस्टा रिकाने ट्रम्प यांच्या मोहिमेला सहमती दर्शवत अवैध प्रवाशांना हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी पनामा आणि ग्वाटेमाला या देशांनीही ट्रम्प यांच्या निर्णयाला सहमती दर्शवली होती. याशिवाय, ब्रिटनने देखील असाच निर्णय घेतला होता.
कोस्टा रिकाची अधिकृत घोषणा
कोस्टा रिका सरकारने सोमवारी (17 फेब्रुवारी) अधिकृत घोषणा करत, अमेरिकेतून डिपोर्ट होणाऱ्या अवैध अप्रवाशांना आपल्या देशात तात्पुरत्या काळासाठी स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले. कोस्टा रिका सरकारच्या अधिकृत घोषणेनुसार, अमेरिकेतून सेंट्रल एशिया आणि भारतातील 200 अप्रवासी 19 फेब्रुवारीला एका व्यावसायिक फ्लाइटने कोस्टा रिकाला पोहोचतील.
अमेरिकन सरकार यासाठी निधी पुरवणार
या सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांना पनामा सीमेजवळ एका तात्पुरत्या माइग्रंट केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असून नंतर त्यांच्या मूळ देशात पाठवले जाणार आहे. कोस्टा रिका सरकारने स्पष्ट केले आहे की, या संपूर्ण प्रक्रियेसाठी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर माइग्रेशन (IOM) यांच्या देखरेखीखाली अमेरिकन सरकार निधी पुरवेल.
डिपोर्टेशनसाठी विविध देशांशी करार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय पदाची शपथ घेतल्यानंतर, अवैध स्थलांतरितांना अमेरिकेतून डिपोर्ट करण्यासाठी विविध देशांसोबत करार करण्यावर भर देण्यात आला आहे. कोस्टा रिका या मोहिमेत सामील झालेला तिसरा देश आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो यांच्या अलिकडच्या लॅटिन अमेरिकन दौऱ्यात पनामा आणि ग्वाटेमाला या देशांनी आधीच या प्रकारच्या कराराला सहमती दिली होती.
लॅटिन अमेरिकन देश अवैध अप्रवाशांचे मूळ ठिकाण
लॅटिन अमेरिकन देश हे मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतील अवैध अप्रवाशांचे मूळ ठिकाण मानले जाते. अनेक बेकायदेशीर प्रवासी एक चांगल्या आयुष्याच्या शोधात जीव धोक्यात घालून खतरनाक प्रवास करतात. इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत सध्या जवळपास 11 मिलियन बेकायदेशीर स्थलांतरित आहेत
इतर देशही होणार सामील
कोस्टा रिका सरकारच्या या निर्णयामुळे अवैध अप्रवासीयांवर नियंत्रण आणण्याच्या ट्रम्प यांच्या मोहिमेस बळ मिळाले आहे. पुढील काळात इतर देशदेखील या मोहिमेत सहभागी होण्याची शक्यता आहे. कोस्टा रिकाने घेतलेला हा निर्णय एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






