सॅम अल्टमन कसे झाले ट्रम्पचे 'खास'? एका फोनवर मिळवला मोठा प्रोजेक्ट, वाचा संपूर्ण प्रकरण (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी AI क्षेत्रात मोठा बदल घवून आणण्यासाठी सुरु केलेल्या स्टारगेट प्रोजेक्टची जबाबदारी ओपन AI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांना दिली. सॅम ऑल्टमन यांनी ट्रम्प यांचा विश्वास जिंकत ही डील मिळवली असून टेक क्षेत्रातील दिग्गज आणि ट्रम्प यांचे खास मित्र एलॉन मस्क यांना मागे टाकले. ट्रम्प प्रशासनाशी संबंध मजबूत करुन ऑल्टमॅन यांनी अमेरिकेच्या AI धोरणावर प्रभाव टाकला आहे.
ऑल्टमॅन यांनी 25 मिनिटाच्या चर्चेत जिंकला ट्रम्प यांचा विश्वास
मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ट ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वीच सॅम ऑल्टमन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 25 मिनिटांचा फोन कॉल झाला होता. या 25 मिनिटांच्या चर्चेदरम्यान ऑल्टमन यांनी अमेरिकेला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात जागतिक आघाडीवर नेण्याची आपली योजना स्पष्ट केली. त्यांनी ट्रम्प यांना आश्वासन दिले की ओपन AI, ओरेकल आणि सॉफ्टबँक मिळून 8.30 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करतील आणि चीनवर आघाडी मिळवतील. ऑल्टमन यांच्या या दृष्टीकोनामुळे ट्रम्प यांचा विश्वास त्यांच्यावर वाढत गेला.
ट्रम्प यांच्याशी जवळीक वाढवत मिळवली मोठी संधी
एलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी 250 दशलक्ष डॉलर्सचा मोठा निधी दिला होता. यामुळे मस्क ट्रम्प प्रशासनावर प्रभाव टाकण्याच्या तयारीत होते. मात्र, ऑल्टमन यांनी वेगळी रणनिती अवलंबत ट्रम्प यांचा निवडणुकीपूर्वीच विश्वास जिंकण्याचा प्रयत्न सुरु केला. खरं तरं ऑल्टमॅन आधी डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक होते. त्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्यावर टिका केली होती. मात्र, आता त्यांनी हळहळू ट्रम्प यांच्या विश्वास मिळवला आणि रिपब्लिकन पक्षात सामील झाले.
तसेच प्रोजेक्ट सुरु केल्यानंतर मस्क यांनी या प्रकल्पावर टीका करताना OpenAI आणि सॉफ्टबँकला आर्थिकदृष्ट्या अशक्त म्हटले होते. एलॉन मस्क यांच्या टीकेला उत्तर देताना AI चे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्यावर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला होता. यामुळे मस्क आणि ऑल्टमन यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता.
AI मध्ये मोठी प्रगती करण्याचे आश्वासन
ऑल्टमन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेल्या प्रस्तावात त्यांच्या कार्यकाळातच ‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ (AGI) म्हणजेच मानवी बुद्धिमत्तेसारखी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जाईल असे आश्वासन दिले. यामुळे अमेरिका AI क्षेत्रात अव्वल स्थानावर असेल हेही त्यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी, ऑल्टमॅन वाइट हाऊसच्या रूजवेल्ट रूममध्ये ट्रम्प यांच्या मागे उभे होते, यावेळीच ट्रम्प यांनी ‘स्टारगेट’ प्रोजेक्टची घोषणा केली होती.
काय आहे स्टारगेट प्रकल्प?
OpenAI, सॉफ्टबँक आणि ओरेकल यांनी संयुक्तपणे स्टारगेट प्रकल्पाची घोषणा केली आहे. या प्रकल्पाचा उद्देश अमेरिका आणि जागतिक स्तरावर AIच्या पायाभूत सुविधा उभारणे आहे. व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकल्पाला इतिहासातील सर्वात मोठा AI इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प म्हणून संबोधले आहे. या प्रकल्पासाठी प्रारंभी 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार असून पुढील चार वर्षांत एकूण 500 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक अपेक्षित आहे. यामुळे अमेरिकेत 1 लाखांहून अधिक रोजगार निर्माण होणार असल्याचे अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे.