भारत-चीन संबंधांमध्ये सुधार? चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची विक्रम मिस्री यांनी घेतली भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नवी दिल्ली: गेल्या वर्षापासून भारत आणि चीन संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या भारतासोबतच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे दोन्ही देशांत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहे. दरम्यान भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध सुधारणांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आला आहे.
सध्या विक्रम मिस्री भारत-चीन संबंध सुधारण्यासाठी दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या शक्तिशाली पॉलिटिकल ब्युरोचे सदस्यासह भारत-चीन सीमा व्यवस्थेसाठी देखील चीनचे विशेष प्रतिनिधी म्हणून कार्य पाहत आहे. भारतीय बाजूने, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या भूमिकेत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- एलॉन मस्क यांच्या राजकीय प्रभावाने बिल गेट्स आश्चर्यचकित; म्हणाले…
दोन्ही देशांत विविध स्तरावर सकारात्मक करार
विक्रम मिस्री यांचा दौरा गेल्या महिन्यात वांग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात विशेष प्रतिनिधी तंत्राच्या अंतर्गत झालेल्या चर्चेनंतर होत आहे. या बैठकीदरम्यान वांग यी यांनी गेल्या वर्षी रशियातील कझान येथे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या भेटीनंतर दोन्ही देशाचे नेते एकमेकांच्या सहमतीचे काटेकोरपणे पालन करत असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांनी मिळून विविध स्तरावर सकारात्मक सहमती दर्शवली असून संबंध सुधारण्याची प्रक्रिया जलद झाली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मत
परराष्ट्र मंत्री वांग यांनी सांगितले की, भारत आणि चीनमधील संबंधांचे सुधार व विकास हे दोन्ही देशांच्या आणि त्यांच्या नागरिकांच्या हिताचे आहेत. तसेच, जागतिक दक्षिणेकडील देशांच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्यात याचा हातभार लागेल. त्यांनी हेही नमूद केले की, भारत आणि चीनमधील चांगले संबंध एशिया आणि जगातील प्राचीन संस्कृतींना शांतता, स्थिरता, विकास आणि समृद्धी देण्यास मदत करतील. वांग यांनी आपसी सहमतीच्या आधारे ठोस पावले उचलण्यावर भर दिला.
इतर नेत्यांसोबत चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंगमध्ये पोहोचल्यानंतर मिस्री यांनी चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुखांची देखील भेट घेतली. या चर्चेत नेत्यांच्या सहमती अंमलात आणणे, संवाद मजबूत करणे, आणि भारत-चीन संबंधांमध्ये स्थिरता आणि सुधारणा घडवून आणण्याच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला.
मिस्री यांचा दौरा चीनच्या नववर्षाच्या आधी होत आहे. चीनचे नववर्ष २९ जानेवारीपासून सुरू होईल आणि एक आठवडा साजरा केला जाईल. या भेटीचा मुख्य उद्देश द्विपक्षीय संवाद मजबूत करणे आणि परस्पर विश्वास निर्माण करणे आहे, यामुळे संबंध अधिक स्थिर होतील.