अलास्कामध्ये भारत-अमेरिका संयुक्त युद्ध सराव: चीनविरुद्ध हिमालयीन रणनीतीची रिहर्सल? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Yudh Abhyas 2025 : भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्य हे आता केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष रणांगणावर दिसत आहे. १ सप्टेंबरपासून अलास्कामध्ये सुरू झालेला ‘युद्ध अभ्यास २०२५’ हा याचाच प्रत्यय देतो. १४ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या या सरावात भारतीय सैनिक आणि अमेरिकन आर्मीचे “आर्क्टिक वुल्व्हज” एकत्र येऊन बर्फाळ डोंगराळ प्रदेशात युद्धकौशल्याचा सराव करत आहेत.
दरवर्षी हा सराव भारत आणि अमेरिकेत आलटून पालटून होतो. मात्र यावेळी अलास्काची निवड ही केवळ भौगोलिक नव्हे, तर रणनीतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाची ठरते. आर्क्टिक आणि इंडो-पॅसिफिक कॉरिडॉरवर लक्ष ठेवण्यासाठी अलास्का हा अमेरिकेच्या संरक्षणासाठी ‘हॉटस्पॉट’ मानला जातो. गेल्या काही वर्षांत रशिया आणि चीनकडून अलास्काच्या दिशेने लष्करी घुसखोरी वाढली आहे. रशियन बॉम्बर्स, चिनी युद्धनौका आणि संयुक्त सरावांनी हा परिसर संवेदनशील बनवला आहे. अशा परिस्थितीत भारतासोबत येथे युद्ध सराव करणे म्हणजे अमेरिका केवळ आपल्या सुरक्षेचा संदेश देत नाही, तर आपल्या मित्रराष्ट्रांनाही सामर्थ्य दाखवत आहे.
अलास्काची कठीण, बर्फाच्छादित परिस्थिती ही भारताच्या उत्तरेकडील सीमेप्रमाणेच आहे. एलओसीवर पाकिस्तानविरुद्ध किंवा एलएसीवर चीनविरुद्ध लढताना भारतीय सैनिकांना अशाच भौगोलिक अडचणींना सामोरे जावे लागते. २०२० मध्ये लडाखमधील संघर्षानंतर भारताने अशा उच्च-उंचीवरील युद्धकौशल्यावर अधिक भर दिला आहे. २०२२ मध्ये औली (उत्तराखंड) येथे झालेल्या युद्ध सरावावर चीनने तीव्र आक्षेप नोंदवला होता. आता अलास्कामध्ये होत असलेला सराव भारताला अमेरिकन आर्क्टिक सैनिकांकडून थेट अनुभव घेण्याची संधी देतो. यामुळे भारतीय जवानांची तयारी, जगण्याची क्षमता आणि ड्रोन ऑपरेशन्समध्ये कौशल्य आणखी वाढेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Ju Ae : अंतर्गत खेळी की पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान? मोठा मुलगा असतानाही किम जोंग उनची मुलगी होणार पुढची हुकूमशहा
या वर्षीच्या सरावात सर्वात जास्त लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे C-UAS प्रशिक्षण. UAS म्हणजे Unmanned Aerial Systems म्हणजेच ड्रोन, तर C-UAS म्हणजे Counter Unmanned Aerial Systems ड्रोनविरोधी तंत्रज्ञान. आधुनिक युद्धामध्ये ड्रोन हेरगिरी, शस्त्रप्रहार आणि इलेक्ट्रॉनिक जॅमिंगसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. त्याविरुद्ध संरक्षण करणे ही आता सर्व सैन्यांसमोरची नवी गरज बनली आहे.
भारतानेही गेल्या काही वर्षांत ड्रोन वापरात प्रगती केली आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कारवाईत ड्रोनने महत्त्वाची भूमिका बजावली. इतकेच नव्हे तर अलीकडे भारताने हिमाचल प्रदेशात अमेरिकन कंपनी शील्ड एआयच्या ‘व्ही-बॅट ड्रोन’ आणि ‘हायव्हमाइंड सॉफ्टवेअर’ची चाचणीही केली आहे, जे जीपीएस किंवा संप्रेषण नसतानाही कार्य करू शकतात. या तंत्रज्ञानामुळे भारताला दुर्गम आणि कठीण भूभागात सैनिकी कारवाई करण्याचा अनुभव मिळतो.
भारत आणि अमेरिकेतील हा सराव केवळ लष्करी व्यायाम नाही, तर दोन लोकशाही देशांच्या रणनीतिक संबंधांचा पुरावा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरनंतरही हा सराव सुरू राहिला यावरून दोन्ही देशांतील नातेसंबंध किती मजबूत आहेत, हे स्पष्ट होते. याव्यतिरिक्त, हा सराव आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनसाठी एक संदेश आहे की, हिमालय असो किंवा आर्क्टिक भारत आणि अमेरिका एकत्र उभे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Muslim Population : मुस्लिम देशांचा नेता बनण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुर्कीमध्ये लोक का सोडत आहेत इस्लाम?
अलास्कामध्ये सुरू झालेला ‘युद्ध अभ्यास २०२५’ हा भारतासाठी फक्त एक सराव नाही, तर एक प्रकारे भविष्यकालीन हिमालयीन संघर्षासाठीची तयारी आहे. उच्च-उंचीवरील लढाई, ड्रोन व काउंटर-ड्रोन ऑपरेशन्स, इलेक्ट्रॉनिक युद्ध, पर्वतीय तोफखाना आणि लॉजिस्टिक सपोर्ट या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीय सैनिकांना नवा अनुभव मिळतो आहे. यामुळे भारताच्या सीमासुरक्षेत नवे बळ येणार हे निश्चित.