BrahMos missile attack Pakistan : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर करण्यात आलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईने शेजारील देशात खळबळ उडवली असून, पाकिस्तानच्या माजी एअर मार्शलने केलेल्या धक्कादायक खुलासामुळे प्रकरणात नव्या उलथापालथी सुरू झाल्या आहेत. माजी पाकिस्तानी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानच्या भोलारी एअरबेसवर थेट हल्ला केला आणि तळ उद्ध्वस्त केला.
पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर : भारताची ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिम
भारताच्या जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने अत्यंत कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली. भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ या नावाने मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानने या कारवाईनंतर भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सेनेच्या तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सहन करावे लागले. याच संदर्भात माजी पाकिस्तानी एअर मार्शल मसूद अख्तर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हिमाचलमध्ये सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा ‘खजिना’; पृथ्वीवरील जीवनाच्या उगमाचा दुवा उजेडात
भोलारी एअरबेसवर भारताचा क्षेपणास्त्र हल्ला
मसूद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, १० मे रोजी सकाळी भारताने जमिनीवरून चार ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली. त्यांनी स्पष्ट केलं की, ही क्षेपणास्त्रे जमिनीवरून जमिनीवर होती की हवेतून जमिनीवर – याबाबत निश्चित माहिती नाही, मात्र ती थेट भोलारी एअरबेसवर आदळली.
या हल्ल्यात पाकिस्तानच्या अत्यंत महत्त्वाच्या AWACS विमानाला मोठे नुकसान झाले. हँगरवर थेट हल्ला झाल्याने काही अधिकारीही मृत्युमुखी पडले, असे त्यांनी कबूल केले. हल्ल्याची माहिती मिळताच पाकिस्तानी वैमानिक विमानांना सुरक्षित स्थळी हलवू लागले, पण तोपर्यंत नुकसान होऊन गेले होते.
भारताच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापुढे पाकिस्तानचे संरक्षण अपयशी
अख्तर यांच्या मते, भारताने वापरलेली ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली अत्यंत अचूक आणि वेगवान आहे. पाकिस्तानने हे क्षेपणास्त्र रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्यांची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णतः निष्क्रिय ठरली.
“आमच्या संरक्षण व्यवस्थेने एकही क्षेपणास्त्र रोखू शकले नाही. हल्ला इतका वेगवान होता की, कोणतीही प्रतिक्रिया देता आली नाही,” असे मसूद अख्तर म्हणाले.
पाकिस्तानची धास्ती वाढली, लष्कर गोंधळले
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या लष्करात आणि प्रशासनात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. भारताची ही कारवाई केवळ दहशतवादी अड्ड्यांपुरती मर्यादित न राहता थेट लष्करी ठिकाणांवर झाल्याने, पाकिस्तान हादरून गेला. पाक लष्करानेही भारताच्या विविध शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला. भारताच्या सर्जिकल कारवायांनी आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी पाकिस्तानचे अनेक लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचे वृत्त आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताची ‘Zero tariff trade deal’ ऑफर; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा, भारत-पाकिस्तान युद्धबंदीवरही मतप्रदर्शन
भारताची धडाडी आणि संदेश
भारताने ब्रह्मोससारख्या अचूक आणि धोकादायक क्षेपणास्त्रांचा वापर करत, केवळ प्रतिशोध घेतला नाही, तर दहशतवादाला मदत करणाऱ्या यंत्रणांना थेट इशारा दिला आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. माजी एअर मार्शलचा हा खुलासा पाकिस्तानसाठी केवळ लाजिरवाणा नाही, तर पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचे प्रतीक मानले जात आहे. भारताच्या या निर्णायक पावलामुळे दक्षिण आशियात सामरिक गणिते नव्याने आखली जात आहेत, आणि भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, दहशतवादाला कोठेही थारा दिला गेला तर त्याचा अचूक आणि कठोर प्रत्युत्तर दिले जाईल.