Middle East conflict : अमेरिकेला नाही ऐकणार इराण; ट्रम्पच्या 'या' निर्णयामुळे तेहरानमध्ये अणुबॉम्बची शर्यत आणखी वाढणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Iran defies US strikes : अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमावर केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. रविवारी( दि. 22 जून 2025 ) अमेरिकेने इराणमधील तीन अणुप्रकल्पांवर बॉम्बहल्ला केला. या कारवाईला अमेरिका आणि इस्रायलने “मोठे लष्करी यश” असे संबोधले असले, तरी जागतिक तज्ज्ञ आणि विश्लेषक याला उलट परिणाम होणारी घडामोड मानत आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुसंधान प्रकल्पांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला असून, इस्रायलनेही या मोहिमेला यश मिळाल्याचे म्हटले आहे. मात्र सीएनएनने आपल्या विश्लेषणात सांगितले आहे की, या हल्ल्यांमुळे इराणचा अणुकार्यक्रम थांबणार नाही, उलट अधिक आक्रमक होईल.
अमेरिकेने या हल्ल्यांत टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बंकर बस्टर बॉम्बांचा वापर करून इराणच्या गुप्त अणुस्थळांना लक्ष्य केले. इराणमधील विविध अणुव्यवस्थांवर झालेल्या या हल्ल्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी अणुकार्यक्रम संपूर्णपणे नष्ट झाला, असे मानण्याचे कारण नाही. अमेरिकेच्या या कृतीमुळे इराणमध्ये अणुबॉम्ब विकसित करण्याची मागणी करणाऱ्यांना मोठे समर्थन मिळू शकते. आजवर इराणने आपला अणुकार्यक्रम शांततेच्या हेतूने असल्याचा दावा केला होता, मात्र या हल्ल्यांनंतर संरक्षणाच्या नावाखाली अण्वस्त्र विकासाचा मार्ग खुला होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Iran Airstrike: ‘वेळ, पद्धत आणि ॲक्शन, सर्वकाही सैन्य ठरवेल’, इराणला राग अनावर, UNSC मध्ये दिली धमकी
या हल्ल्याने इराणमध्ये अमेरिकेवर विश्वास न ठेवणाऱ्या गटांचा आवाज अधिक बळकट होईल. अण्वस्त्र विरोधी आंतरराष्ट्रीय करार ‘एनपीटी’मधून इराण बाहेर पडू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः, जेव्हा अणुचर्चा सुरू असताना अमेरिकेने थेट हल्ला केला, तेव्हा या चर्चेचा काही उपयोगच नसल्याचे इराण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडू शकतो. परिणामी, जागतिक अणुशस्त्र अप्रसाराच्या प्रयत्नांनाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “अमेरिकेने इराणवर केलेले हे हल्ले ट्रम्प प्रशासनासाठी आत्मघातकी ठरतील.” ते पुढे म्हणाले की, “या हल्ल्यांनंतर इराण आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक सहानुभूती मिळवेल. काही देश इराणला अणुशक्ती विकसित करण्यास मदत करायला तयार होतील.” त्यामुळे अमेरिकेचा हा हल्ला इराणला कमकुवत करण्याऐवजी अधिक बलशाली बनवण्याचे काम करू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Middle East conflict : रशिया पण युद्धात उडी मारणार का? इराणचे परराष्ट्र मंत्री आज पुतिन यांना भेटणार
जागतिक शांततेसाठी अणुकार्यक्रमांवर मर्यादा घालणे अत्यावश्यक आहे. मात्र अमेरिका आणि इस्रायलच्या आक्रमक कारवाया इराणला अण्वस्त्रांपासून दूर ठेवण्याऐवजी त्याच्या आकांक्षा अधिक तीव्र करू शकतात. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, आता इराणमध्ये राजकीय आणि सामाजिक पातळीवरही अणुबॉम्बची मागणी वाढू शकते. अमेरिकेच्या या धोरणामुळे प्रश्न मिटण्याऐवजी अण्वस्त्रांच्या शर्यतीला गती मिळण्याची भीती आहे – आणि हे केवळ इराणपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण पश्चिम आशियात अस्थिरता निर्माण करू शकते.