इराण फोडणार का इस्रायलसाठी ढाल बनलेल्या अमेरिकी सैन्याचा वेढा? मीडल ईस्टमध्ये कुठे कुठे आहेत तळ?
इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ला केल्यामुळे मीडल ईस्ट म्हणजेच अरब देशांमध्ये सध्या भीषण युद्धसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गाझानंतर आता इस्रायलने इराणकडे मोर्चा वळवला आहे. युद्ध भडकलं तर संपूर्ण अरब देश यात होरपळून निघण्याची भीती सामरिक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान अरब देशांमध्ये असलेले आणि इस्रायलसाठी ढाल बनलेले अमेरिकी सैनिक आणि नाविक तळ इराणची डोकेदुखी वाढवण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
Israel-Iran War : इस्रायलची दोन लढाऊ विमाने इराणने केली उद्धवस्त; खळबळजनक दाव्याने अमेरिकेला धक्का
अमेरिकेने मध्यपूर्वेत अनेक दशकांपासून आपली सैनिकी उपस्थिती टिकवून ठेवली आहे. सध्या अंदाजे ४०,००० ते ५०,००० अमेरिकन सैनिक या प्रदेशातील किमान १९ ठिकाणी तैनात आहेत.अमेरिकेने बुधवारी जाहीर केले की, त्यांनी इराकमधील आपत्कालीन परिस्थितीमुळे तेथील दुतावासाचा काही भाग रिकामा करण्याचा निर्णय घेतला आहे. बहारिन, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या ठिकाणी असलेल्या अमेरिकी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना “स्वेच्छेने स्थलांतर करण्याची” परवानगी देण्यात आली आहे.
“हा प्रदेश धोकादायक ठरू शकतो” म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी संध्यकाळी म्हटलं आहे. सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील अणुकराराविषयीच्या चर्चेत कोणतीही प्रगती न झाल्यामुळे तणाव वाढत आहे. त्यातच इस्रायलने इराणवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिली आहे, त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे.
अमेरिका मध्यपूर्वेत अनेक दशकांपासून सैन्य तळ चालवत आहे. Council on Foreign Relations च्या माहितीनुसार, अमेरिका या भागात किमान १९ ठिकाणी तात्पुरते आणि कायमस्वरूपी सैनिकी तळ चालवत आहे. त्यापैकी आठ तळ हे कायमस्वरूपी असून ते बहरैन, इजिप्त, इराक, जॉर्डन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये आहेत.
अमेरिकेने मध्यपूर्वेत पहिल्यांदा १९५८ मध्ये सैन्य पाठवलं. लेबनॉन संकटाच्या वेळी बेरूतमध्ये सैनिकांची तैनाती केली. त्या वेळी सुमारे १५,००० मरीन आणि सैनिक पाठवण्यात आले होते. २०२५ च्या मध्यपर्यंत, अंदाजे ४०,००० ते ५०,००० अमेरिकी सैनिक मध्यपूर्वेत आहेत. हे सैनिक मोठ्या कायमस्वरूपी तळांवर आणि लहान तात्पुरत्या तळांवर तैनात आहेत.
सर्वाधिक अमेरिकी सैनिक कतार, बहरैन, कुवेत, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये आहेत. हे तळ हवाई आणि नौदल ऑपरेशन्ससाठी, प्रादेशिक लॉजिस्टिक्स, गुप्तचर संकलन आणि लष्करी उपस्थितीसाठी महत्त्वाचे मानले जातात.
अल उदैद हवाई तळ (कतार) – मध्यपूर्वेतील अमेरिकेचा सर्वात मोठा तळ, १९९६ मध्ये स्थापन. सुमारे २४ हेक्टर (६० एकर) क्षेत्रफळ असलेल्या या तळावर जवळपास १०,००० सैनिक आहेत आणि सुमारे १०० विमानांसह ड्रोन तैनात आहेत. हे ठिकाण US Central Command (CENTCOM) चे मुख्यालयही आहे आणि इराक, सीरिया व अफगाणिस्तानमधील मोहिमांसाठी केंद्रबिंदू राहिले आहे.
नेव्हल सपोर्ट अॅक्टिव्हिटी (NSA), बहारिन – पूर्वीच्या ब्रिटिश नौदल तळाच्या जागेवर उभा राहिलेला अमेरिकन नौदल तळ. सुमारे ९,००० सैनिकी आणि नागरी कर्मचारी येथे कार्यरत आहेत. हे US Navy च्या Fifth Fleet चे मुख्यालय असून, परिसरातील नौदल, हवाई दल आणि इतर लष्करी तळांना सुरक्षा व मनुष्यबळ पुरवतं.
अल-धाफ्रा हवाई तळ (संयुक्त अरब अमिराती) – गुप्तचर, हेरगिरी व हवाई लढाईसाठी महत्त्वाचा तळ. येथे F-22 Raptor सारखी आधुनिक लढाऊ विमाने, ड्रोन आणि AWACS सारखी हेरगिरी करणारी विमाने तैनात आहेत.
एरबिल हवाई तळ (इराक) – इराकच्या उत्तरेकडील भागात, विशेषतः कुर्द व इराकी दलांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सीरियामधील ऑपरेशन्ससाठी वापरले जाते.