IRGC Threatens US : आखातात पुन्हा युद्धाचा भडका! इराणची अमेरिकन तळांवर हल्ल्याची उघड धमकी, होर्मुझ पुन्हा बंद होणार? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, IRGC ने स्पष्ट केले आहे की त्यांच्या हितसंबंधावर किंवा उर्जा सुरक्षेवर कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही. त्यांच्या मालमत्तेला कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. याला प्रत्युत्तर म्हणून थेट आखातात असलेल्या अमेरिकन लष्करी तळांवर प्रहार केला जाईल असे IRGC ने म्हटले आहे. या धमकीमुळे पुन्हा एकदा तणाव भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इराणच्या लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रामिनिया यांनी इराणी जहाजांवरील हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, इराणविरोधी लष्करी मोहिमेत सहभागी असलेल्या आणि अमेरिकेने लादलेल्या निर्बंधाचे पालन करणाऱ्या देशांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल. कोणत्याही शत्रू देशाने होर्मुझ पार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागेल असे मोहम्मद अक्रामिनिया यांनी म्हटले आहे. अमेरिका इराणच्या जहाजांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
या तणावादरम्यानच कतारची राजधान दोहाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले आहे. युनायटेड किंगडम मॅरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे जहाजावर आग लागली होती. सुदैवाने आग तातडीने विझवण्यात आल्याने कोणतीही जीविताहानी झालेली नाही.
दुसरीकडे एका भारतीय जहाजावरही गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात एका भारतीय नाविकाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने दुबई बंदरावर सुरक्षित पोहचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या या वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत एक ड्रिस्ट्रॉयर तैनात केले असून युद्ध आणखी पेटू शकते. या तणावामुळे जागतिक इंधन दरांमध्ये अस्थिरता निर्माण होत आहे. ज्याचा बाजारपेठांवर गंभीर परिणाम होत आहे.






