नवी दिल्ली – गुरुवारी काही लोकांनी वॉशिंग्टन विमानतळावर पाकिस्तानचे अर्थमंत्री इशहाक डार यांना घेराव घातला. या लोकांनी ‘चोर-चोर’च्या घोषणा देखील दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक बँकेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी डार वॉशिंग्टनला गेले होते.
या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये डार पाकिस्तानमधील अमेरिकेचे राजदूत मसूद खान यांच्यासोबत दिसत आहेत. विमानतळावरून बाहेर पडताच लोकांनी डार यांना खोटारडे म्हणत घोषणाबाजी सुरू केली. डार यांनीही प्रत्युत्तरात आंदोलकांना खोटे म्हटले. त्याचवेळी पीएमएल-एनच्या व्हर्जिनिया चॅप्टरचे अध्यक्ष मणी बट यांचीही आंदोलकांशी झटापट झाली.
पाकिस्तानी नेते एखाद्या देशात गेल्यावर त्यांना अशी वागणूक मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना मदिना येथे पाकिस्तानींच्या घोषणाबाजीला सामोरे जावे लागले होते.