हमासला संपवण्यासाठी इस्रायलने उचलले शेवटचे पाऊल! मोराग कॉरिडॉरवर ताबा, गाझामध्ये मानवी संकट गहिरे ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
तेल अवीव / गाझा : इस्रायल-हमास संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचताना दिसत आहे. इस्रायली लष्कराने गाझा पट्टीतील अत्यंत महत्त्वाच्या मोराग कॉरिडॉरवर नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली आहे. यामुळे गाझाचे रफाह शहराशी आणि बाहेरील जगाशी असलेले अंतिम संपर्क मार्ग बंद झाले आहेत. हा हमाससाठी अत्यंत मोठा धक्का असून, गाझा परिसरातील मानवीय संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे.
रफाह हा गाझा पट्टीचा इजिप्तशी जोडणारा महत्त्वाचा प्रवेशद्वार आहे. याच मार्गाने मानवतावादी मदत, औषधे, अन्न आणि पाणी गाझामध्ये पोहोचत असे, तसेच हमासकडे शस्त्रास्त्रे आणि निधी पोहोचण्याचाही हा एक प्रमुख मार्ग असल्याचे अहवाल सांगतात. इस्रायलच्या या कारवाईमुळे गाझातील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे.
इस्रायली संरक्षण दलांनी शनिवारी दुपारी अधिकृतपणे जाहीर केले की, दक्षिण गाझामधील मोराग कॉरिडॉर ताब्यात घेण्याचे अभियान यशस्वी झाले आहे. यामुळे खान युनूस आणि रफाहमधील संपर्क पूर्णतः तुटला आहे. गाझा डिव्हिजन आणि ३६ व्या डिव्हिजनने या मोहिमेत प्रमुख भूमिका बजावली आहे. फिलाडेल्फिया कॉरिडॉरमधील सीमावर्ती भागातही इस्रायली सैन्य सक्रिय झाले आहे, ज्यामुळे गाझा पट्टी पूर्णतः वेढली गेली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘गैर-मुस्लिम प्राण्यांपेक्षा भयंकर…’ तालिबानी मंत्र्यांचे द्वेषपूर्ण विधान, अफगाण हिंदू-शीख समाजात भीतीचे वातावरण
रफाह मार्ग बंद झाल्यामुळे गाझामध्ये अन्न, पाणी आणि औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. हजारो पॅलेस्टिनी नागरिक दिवसेंदिवस उपासमारीच्या छायेखाली आहेत. इस्रायलने ही मोहीम हमासविरोधात निर्णायक टप्पा असल्याचे सांगितले असले तरी, नागरिकांना याचे परिणाम भयावह स्वरूपात भोगावे लागत आहेत. संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, “गाझामध्ये लष्करी कारवाईचा विस्तार होणार असून, नागरिकांनी हमासविरोधात उठाव करावा आणि बंदिवानांना सोडवावे.” या विधानामुळे गाझामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
इस्रायली लष्कराच्या अरबी प्रवक्त्याने शनिवारी खान युनूस शहरातील काही भागांत नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. हमासने या भागातून डागलेल्या कथित रॉकेटच्या प्रत्युत्तरात इस्रायली लष्कराने जोरदार ड्रोन आणि तोफखान्याचे हल्ले सुरू केले आहेत. या कारवाईत किमान दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून, नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा विस्थापनाचा सामना केला आहे. आता संपूर्ण गाझामध्ये कोणताही सुरक्षित आश्रय उरलेला नाही, अशी स्थिती आहे.
गेल्या १७ महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास संघर्षात इस्रायलने आपला विजय निश्चित करण्यासाठी प्रचंड हानी सहन करूनही मोहीम सुरू ठेवली आहे. हजारो पॅलेस्टिनी नागरिकांचा जीव घेतल्यावरही इस्रायली सैन्य थांबलेले नाही. मोराग कॉरिडॉरवरील नियंत्रण हा युद्धाचा अंतिम टप्पा मानला जात आहे, आणि आता इस्रायली लष्कर संपूर्ण गाझा पट्टीवर ताबा मिळवण्यासाठी पुढे सरसावत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ट्रम्पसमोर झुका, अन्यथा विनाश अटळ…’ इराणी अधिकाऱ्यांचा सर्वोच्च नेत्यांना इशारा
इस्रायली लष्कराची ही मोहीम हमासविरोधात निर्णायक ठरणार असली तरी, त्याचा सर्वाधिक फटका सामान्य पॅलेस्टिनी नागरिकांना बसत आहे. अन्न, पाणी, औषधे आणि निवाऱ्याचा अभाव या लोकांचे जीवन भयावह बनवत आहे. मोराग कॉरिडॉरचा ताबा हे युद्धनैतिकदृष्ट्या इस्रायलसाठी मोठे यश मानले जात असले तरी, या यशाच्या बदल्यात भयंकर मानवी संकट उभे राहिले आहे – ज्याची किंमत संपूर्ण जगाला विचार करायला लावणारी आहे.