फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कैरो: सध्या इस्त्रायल इराण यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इस्त्रायल सातत्याने इराणवर हल्ले करत आहे. दरम्यान इस्त्रायलने पुन्हा एकदा उत्तर गाझावर आणखी एक भीषण हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पॅलेस्टिनी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने उत्तरेकडील बीट लाहिया शहरात शनिवारी रात्री उशिरा पुन्हा एकदा हल्ला केला. या हल्ल्यात 11 महिला आणि दोन मुलांसह 22 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने गाझा आणि लेबनॉनवर सातत्याने क्षेपणास्त्र आणि जमिनीवर हल्ले चालूच ठेवले आहेत.
इराणने केली युद्धबंदीची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर इराणने गाझा आणि लेबनॉनमध्ये युद्धबंदीची मागणी केली आहे. इराणच्या लष्कराने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये युद्धविरामाची विनंती केली आहे. इराणच्या लष्कराने म्हटले आहे की, इस्रायलविरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई करण्याचा अधिकार त्यांना आहे, परंतु इस्रायलच्या हल्ल्यानंतर तेहरान तणाव आणखी वाढू नये यासाठी मार्ग शोधत आहे.
प्रत्युत्तरही देऊ शकतो, पण नागरिकांच्या सुरक्षेसाठी शांततेचा मार्ग काढत आहोत
26 ऑक्टोबर रोजी इस्रायलने तेहरानवर जोरदार हल्ला केला होता, ज्यामध्ये किमान 4 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय इराणच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर इराणने इस्रायलकडून बदला घेण्याचे वचन दिले आहे. इराणच्या लष्कराने सांगितले की, इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते तयार आहेत, परंतु त्यांनी शांततेच्या मार्गाचा शोध घेण्याचेही प्रयत्न केले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा प्रयत्न सुरू आहेत.
गाझा पट्टीवर झालेल्या हल्ल्यामुळे तणाव वाढला असून, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी इराणने आंतरराष्ट्रीय समुदायाला मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. पॅलेस्टिनी जनता या हल्ल्यांमुळे मोठ्या संकटात सापडली आहे, आणि इराणने युद्धविरामाच्या मागणीद्वारे या संघर्षाचा शांततामय मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. इस्रायलने पुन्हा एकदा आपली सैन्य शक्ती दाखवत गाझा पट्टीवर हल्ला केला आहे, ज्यामुळे पॅलेस्टिनी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणच्या युद्धविरामाच्या मागणीनंतरही, परिस्थिती कितपत शांत होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
इस्त्रायली लष्कराने वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना ओलीस ठेवले
इस्रायली सैन्याने शनिवारी उत्तर गाझा येथील हॉस्पिटल कॉम्प्लेक्समधून माघार घेतली. मात्र त्यांनी पुन्हा एकदा हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तसेच पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली लष्कराने अनेक पुरुष वैद्यकीय कर्मचारी आणि काही रुग्णांना ताब्यात घेतले.इस्त्रायल लष्कराने 70 सदस्यीय हॉस्पिटल टीमपैकी किमान 44 जणांना ताब्यात घेतले.
हे देखील वाचा- पाकिस्तानमध्ये 48 तासांत दुसरा दहशतवादी हल्ला; लोकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली