फोटो सौजन्य: सोशल मीडिया
जेरुसेलम: इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझामध्ये शनिवारी रात्री जोरदार हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे गाझापट्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये दोन मुलांसह किमान सहा जण ठार झाले, तर अनेक जखमी झाले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुवासी भागात हे हल्ले करण्यात आले असून यामध्ये ठार झालेल्यांमध्ये दोन लहान मुले आणि त्यांची आई होती. याशिवाय त्यांच्या कुटूंबातील इतर सदस्य देखील होते.
स्थलांतरितांच्या ठिकाणांवर हल्ला
मीडिया रिपोर्टनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या असोसिएटेड प्रेसच्या प्रतिनिधींनी मृतदेहांची पाहणी केली. मुवासी हा विस्थापित लोकांसाठी तयार केलेला तात्पुरता तंबू छावणी परिसर आहे. सध्या या ठिकाणी हजारो लोक राहत आहेत. याशिवाय इजिप्तच्या सीमेजवळील दक्षिणेकडील रफाह शहरात झालेल्या वेगळ्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. इस्रायली सैन्याने मात्र कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांबाबत अनभिज्ञता व्यक्त केली आहे.
अतिरेक्यांना लक्ष्य करुन हल्ला करण्यात आला- इस्त्रायलचा दावा
इस्रायलने पुन्हा एकदा दावा केला आहे की ते फक्त अतिरेक्यांना लक्ष्य करते आणि नागरिकांना हानी पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करते. परंतु गाझा पट्टीतील वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत आहे.दरम्यान, एका वेगळ्या घटनेत येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी डागलेल्या क्षेपणास्त्रामुळे मध्य इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजवले. हे क्षेपणास्त्र इस्रायलच्या सीमेत पोहोचण्याआधीच पाडण्यात आले असल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
नेतन्याहूंचे सरकार गाझा पट्टी ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात – माजी संरक्षणमंत्री मोशे यालॉन
इस्रायलच्या आताच्या हल्ल्यांवर माजी संरक्षणमंत्री मोशे यालॉन यांनी कठोर टीका केली आहे. त्यांनी इस्रायल सरकारवर वांशिक शुद्धीकरणाचा आरोप करत गाझामध्ये सुरू असलेल्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 2016 मध्ये राजीनामा दिलेले यालॉन हे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारचे कट्टर विरोधक आहेत. त्यांचा आरोप आहे की, नेतन्याहूंचे सरकार गाझा पट्टी ताब्यात घेण्याच्या आणि वांशिक शुद्धीकरणाच्या प्रयत्नात आहे.
युद्धविरामाचे उल्लंघन करत गाझावर हल्ले
दोन दिवसांपूर्वीच देखील इस्त्रायलने हिजबुल्लाह-इस्त्रायल युद्धविरामाचे उल्लंघन करुन गाझामध्ये हल्ले केले होते. तिसऱ्या दिवशी प्रवेश करणाऱ्या युद्धविरामाने या संघर्षात थोडासा विराम दिला आहे, परंतु त्याचा भंग होण्याची भीती अजूनही आहे. लेबनॉनने इस्रायलवर युद्धविराम उल्लंघनाचा आरोप केला आहे, ज्यामुळे या संघर्षाच्या भवितव्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इस्रायल हिजबुल्लाह संघर्ष अधितक तीव्र झाला आहे.