तुर्की इस्रायलच्या मार्गावर; ‘Steel Dome’द्वारे हवाई संरक्षण यंत्रणा बळकट करण्याचा निर्णय ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Shahbaz Sharif‑Rubio call : इराणवरील इस्रायली क्षेपणास्त्र हल्ल्याने संपूर्ण मध्य पूर्व क्षेत्रात खळबळ उडवली आहे. विशेषतः मुस्लिम देशांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर तुर्कीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, देशभरात इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ प्रणालीच्या धर्तीवर ‘स्टील डोम’ हवाई संरक्षण प्रणाली उभारण्याची घोषणा केली आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही प्रणाली क्षेपणास्त्र, ड्रोन आणि इतर हवाई हल्ल्यांपासून देशाचे सर्वांगीण संरक्षण करेल. ‘स्टील डोम’ संपूर्ण तुर्कीमध्ये तैनात केली जाणार असून सीमावर्ती भागापुरती मर्यादित राहणार नाही.
इराणवर इस्रायलने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक मुस्लिम देशांच्या डोळ्यात अंजन घातले. तुर्कीलाही आता कळून चुकले आहे की केवळ राजकीय टीका आणि भाषणबाजी पुरेशी नाही; तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे तुर्की सरकारने लवकरच ‘स्टील डोम’ प्रणाली अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ही प्रणाली इस्रायलच्या आयर्न डोम प्रमाणे कार्य करेल. शत्रूच्या रॉकेट, ड्रोन किंवा क्षेपणास्त्राला तुर्कीच्या सीमेत प्रवेश करण्याआधीच ओळखून त्याचा अचूक वेध घेणे आणि हवेतच नष्ट करणे, ही या यंत्रणेची मुख्य ताकद असेल. या प्रणालीमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारे रडार, इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे आणि तांत्रिक नियंत्रण यंत्रणा असतील. हे केवळ लष्करी तळांनाच नव्हे, तर नागरी क्षेत्रांनाही संरक्षण प्रदान करतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारत-पाक-अमेरिका त्रिकोणात नवे राजकारण; शाहबाज शरीफ-मार्को रुबियो भेटीमुळे भारतासाठी वाढतोय का तणाव?
तुर्की सरकारच्या योजनेनुसार, ‘स्टील डोम’ हा एक मोठ्या स्वरूपाचा संरक्षण आराखडा असून तो जमिनीवर, हवेत आणि समुद्रात तिन्ही पातळ्यांवर अंमलात आणला जाणार आहे.
या योजनेत खालील तांत्रिक साधनांचा समावेश होईल:
1. हायपरसॉनिक, बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे
2. आधुनिक युद्धनौका आणि टँक
3. पायलटलेस ड्रोन (UAVs)
4. नवीन पिढीची विमानवाहू युद्धनौका आणि रडार प्रणाली
तुर्की सध्या नाटोमधील दुसरे सर्वात मोठे लष्कर असलेला देश आहे. तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, त्यांनी नाटोच्या २% संरक्षण खर्चाच्या उद्दिष्टांपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे तुर्की आता नाटोच्या टॉप-५ सामरिक भागीदारांमध्ये गणले जात आहे. ही योजना केवळ तुर्कीच्या अंतर्गत सुरक्षेसाठीच नाही, तर जागतिक स्तरावर सामरिक प्रभाव वाढवण्यासाठीही महत्त्वाची ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
इस्रायलने तयार केलेली ‘आयर्न डोम’ प्रणाली आज जगातील सर्वोत्तम हवाई संरक्षण व्यवस्थांपैकी एक मानली जाते. ही प्रणाली ४ ते ७० किमी अंतरावरील रॉकेट आणि मोर्टार क्षेपणास्त्रांना अचूकतेने हवेत नष्ट करण्यास सक्षम आहे. तिचा यशाचा दर ९०% पेक्षा अधिक आहे. तुर्कीने याच प्रणालीवरून प्रेरणा घेत ‘स्टील डोम’ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांची घोषणा; ‘लवकरच भारतासोबतही मोठा व्यापार करार’, चीन-अमेरिका करारानंतर नवा संकेत
तुर्कीच्या ‘स्टील डोम’ योजनेने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे – आता तुर्की आंतरराष्ट्रीय पातळीवर भाषणांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणार आहे. शस्त्रसज्जता, तांत्रिक प्रगती आणि राष्ट्रीय सुरक्षा यामध्ये भक्कम गुंतवणूक करून तुर्की आपले स्थान जागतिक सामरिक नकाशावर अधिक ठामपणे अधोरेखित करत आहे. या निर्णयाने तुर्कीने केवळ रशिया वा इस्रायललाच नव्हे, तर संपूर्ण जागतिक शक्तींना एक संदेश दिला आहे – तुर्की आता फक्त बोलणार नाही, तर लढण्यासाठीही पूर्ण सज्ज आहे.