Kirana Hills : किराणा हिल्सवरील अणु केंद्रावर हल्ला? अमेरिकेची पहिली प्रतिक्रिया, तपासणीसाठी पथक रवाना ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Pakistan Ceasefire News : पाकिस्तानमधील किराणा हिल्स येथील संवेदनशील अणुसुत्रावर भारताने हवाई हल्ला केल्याच्या वृत्तांनी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडवली आहे. या हल्ल्यानंतर तिथे रेडिओअॅक्टिव्ह गळती झाल्याचा दावा अनेक संरक्षण विश्लेषकांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने प्रथमच यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी घटनेच्या तपासणीसाठी आपले पथक घटनास्थळी पाठवले असल्याची माहिती दिली आहे.
भारतीय लष्कराने अलीकडेच “ऑपरेशन सिंदूर” अंतर्गत पाकिस्तानमधील सरगोधा आणि नूरखान या महत्त्वाच्या हवाई तळांवर अचूक हवाई हल्ले केले. याच दरम्यान, किराणा हिल्स परिसरात भारतीय लढाऊ विमानांनी टाकलेले बॉम्ब एक अत्यंत संवेदनशील अणुसुत्रावर पडल्याचा दावा अनेक माध्यमांतून करण्यात आला. पाकिस्तानमधील किरणा हिल्स हा भाग जमिनीखालील अणुसुत्र आणि प्रयोगशाळांसाठी ओळखला जातो, त्यामुळे या हल्ल्याने आण्विक धोक्याचे सावट निर्माण झाले आहे. तथापि, भारतीय लष्कराने अशा कोणत्याही अणुव्यवस्थांवर हल्ला केल्याचा स्पष्ट इन्कार केला आहे.
हल्ल्यानंतर किरणा हिल्स परिसरात किरणोत्सर्गी गळतीच्या खुणा दिसत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याच अनुषंगाने अमेरिकेचे वैज्ञानिक निरीक्षण पथक आणि विश्लेषकांनी घटनास्थळी भेट दिली आहे. हा प्रकार अत्यंत संवेदनशील असल्यामुळे त्यावर जगभरातील संरक्षण यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते थॉमस पिगॉट यांनी १३ मे २०२५ रोजी पत्रकार परिषदेत सांगितले की, “सध्या आमच्याकडे या घटनेचे पूर्वावलोकन सादर करण्यासाठी निश्चित माहिती नाही. मात्र, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या अडचणीत वाढ; ‘मोबाईल बॉम्ब’च्या वाढत्या धोक्यामुळे देशाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह
युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी संपर्क साधला. ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांनी दाखवलेल्या शहाणपणाचे आणि संयमाचे कौतुक केले आहे. थॉमस पिगॉट म्हणाले, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प युद्ध नको तर शांततेचे समर्थक आहेत. त्यांनी नेहमीच अमेरिकेचा ‘America First’ अजेंडा राबवताना जगभर शांतता टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील थेट संवादास प्रोत्साहन देण्यावर भर देतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या राजकारणात वाहणार बदलाचे वारे; तुरुंगातूनही इम्रान खानने खेळली तिरपी चाल
विश्लेषकांच्या मते, किरणा हिल्सवर भारतीय हल्ल्याच्या दाव्यांमुळे पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांमुळे भारताच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ क्षमतेचा जागतिक पातळीवर नवा दाखला मिळाला आहे. सारांशतः, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे भारतीय लष्कराची क्षमता सिद्ध झाली आहे, तर अमेरिकेची प्रतिक्रिया हे सूचित करते की, जगभरातील महाशक्तीही आता दक्षिण आशियातील सुरक्षास्थितीकडे गांभीर्याने पाहू लागल्या आहेत. भविष्यात ही घटना भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये निर्णायक वळण ठरू शकते.