चीनमधील बाजारपेठेत भीषण आग; 8 जणांचा जळून मृत्यू, 15 जखमी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शांघाय: चीनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील झांगजियाकौ शहरातील एका बाजारपेठेत लागलेल्या भीषण आग लागली. या आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 15 लोक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना लिगुआंग मार्केट या खाद्य बाजारपेठेत घडली. आग एवढी भीषण होती की, संपूर्ण शहर काळ्या धुराने वेढले गेले. स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी तातडीने काम सुरू केले. दुपारी 2 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली.
इंग्रजी वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ही आग गॅस सिलिंडरचा स्फोट, मांस शिजवण्यासाठी वापरलेले कोळशाचे जळण किंवा फेकलेल्या सिगारेटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूमिगत गॅस पाईपलाइनमधून होणाऱ्या गळतीलाही या दुर्घटनेचे कारण मानले जात आहे. घटनेची चौकशी सुरू असून प्रशासनाने बाजारपेठेतील सुरक्षितता आणि तांत्रिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.
आगीत मोठे नुकसान
झांगजियाकौ शहर हे बीजिंगच्या जवळ असून 2022 च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या दुर्घटनेने स्थानिक बाजारपेठेतील व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. जळून नष्ट झालेली दुकाने आणि बाजारपेठेत झालेले आर्थिक नुकसान भरून येणे कठीण आहे.
Eight people are dead and 15 injured after a fire broke out at a vegetable market in Zhangjiakou, northern China, on Saturday morning. The blaze, which started at 8:40 AM, was largely extinguished by noon. The cause of the fire is under investigation. pic.twitter.com/iG6IgIRJIe
— Volcaholic 🌋 (@volcaholic1) January 4, 2025
काही दिवसांपूर्वी झुहाईत अपघात
या घटनेपूर्वी झुहाई शहरात मोठ्या अपघाताची घटना घडली होती. 62 वर्षीय चालकाने वाहनावरील नियंत्रण गमावून गर्दीत गाडी घुसवली. या दुर्घटनेत 35 लोकांचा मृत्यू झाला, तर 43 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. या घटनेच्या वेळी झुहाई येथे प्रतिष्ठित एअर शो सुरू होता, ज्यामुळे शहरात मोठी गर्दी होती. या अपघातातील आरोपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, हा अपघात होता की जाणीवपूर्वक केलेली कृती, याची चौकशी सुरू आहे.
सुरक्षेचा आढावा घेण्याची गरज
सतत होणाऱ्या या घटनांमुळे चीनमधील सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. आगीची घटना असो वा अपघात, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेची योग्य काळजी घेतली जावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.