फोटो सौजन्य: सोशल मीडिया
लंडन: ब्रिटनमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका आण्विक पाणबुडीला भीषण आग लागली आहे. या आगीत दोनजण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या उत्तर-पश्चिम भागातील बॅरो-इन-फर्नेस येथील BAE सिस्टम्स शिपयार्डमध्ये, जे रॉयल नेव्हीसाठी आण्विक पाणबुड्या तयार करतात येथे मोठी आग लागली. यामुळे खळबळ उडाली आहे. याशिवाय या दुर्घटनेत दोन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
मीडिया रिपोर्टनुसार, आग लागलेली पाणबुडी, आण्विक क्षमता असलेल्या पाणबुड्यांपैकी एक असल्याने अण्वस्त्र धोक्याची शक्यता उपस्थित केली जात आहे. मात्र, ब्रिटीश अणु अधिकाऱ्यांनी कोणत्याही आण्विक धोका असण्याची शक्यता नाकारली आहे. कुंब्रिया कॉन्स्टेब्युलरीने दिलेल्या माहितीनुसार, आग मध्यरात्रीनंतर लागली आणि त्यामुळे त्वरित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सोशल मीडियावरून शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये डेव्हनशायर डॉक हॉल इमारतीतून प्रचंड ज्वाळा आणि काळा धूर निघताना दिसत होता.
हे देखील वाचा- कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प, कोण मारणार बाजी? सर्वेक्षणातून आले समोर
यामुळे शिपयार्डच्या आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान शिपयार्डजवळ राहणाऱ्या एका रहिवाशाने सांगितले की, “दरवाजा उघडताच मला मोठ्या प्रमाणात काळा धूर दिसला,” जी घटनास्थितीची गंभीरता अधोरेखित करते.या आगीत अडकलेल्या दोन व्यक्तींना धुरामुळे गुदमरायला सुरुवात झाली होती, मात्र त्यांची वेळेवर सुटका करण्यात आली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिपयार्ड परिसरात तात्काळ सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमुळे शिपयार्डजवळ राहणाऱ्या नागरिकांना घरात राहण्याचा आणि खिडक्या-दारे बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. धोक्याचे स्वरूप लक्षात घेऊन, शिपयार्ड परिसरात तात्काळ सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, जरी आग भीषण होती तरी यामुळे कोणताही आण्विक धोका निर्माण झालेला नाही. तसेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाने त्वरित पोहोचले आणि कार्यवाही करून आग आटोक्यात आणली आहे. या घटनेने ब्रिटनमध्ये अण्वस्त्र सुरक्षा आणि शिपयार्डच्या सुरक्षिततेबद्दल चिंता निर्माण झाली आहे. यावर सुरक्षा यंत्रणेची चर्चा सुरू केले आहे.