फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कैरो: एकीकडे इस्त्रायल इराण तर दुसरीकडे इस्त्रायल-हमास यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. इस्त्रायल सातत्याने इराणवर हल्ले करत आहे. दरम्यान इस्त्रायलने पुन्हा एकदा उत्तर गाझावर आणखी एक भीषण हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, इस्त्रायलने मंगळवारी गाझाच्या दोन उत्तरी भागांवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 88 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये मुले आणि महिलांचा देखील समावेश आहे.
गाझामधील राहिवाशांची परिस्थिती अत्यंत बिकट
गाझामधील रुग्णालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे, मात्र सततच्या हल्ल्यांमुळे त्यांच्यावर योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलने गेल्या काही आठवड्यांत गाझाच्या उत्तर भागात हवाई हल्ल्यांमध्ये वाढ केली आहे. या हल्ल्यांचा उद्देश हमासच्या दहशतवाद्यांना संपवणे असल्याचे इस्त्रायने सांगितले आहे. या संघर्षामुळे गाझामधील राहिवाशांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.
इराणने केली युद्धबंदीची मागणी
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी झालेल्या गाझावरील हल्ल्यानंतर इराणने गाझा आणि लेबनॉनमध्ये युद्धबंदीची मागणी केली आहे. इराणच्या लष्कराने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी गाझा पट्टी आणि लेबनॉनमध्ये युद्धविरामाची विनंती केली आहे. इराणच्या लष्कराने म्हटले आहे की, इस्रायलविरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई करण्याचा अधिकार त्यांना आहे, परंतु इस्रायलच्या हल्ल्यानंतर तेहरान तणाव आणखी वाढू नये यासाठी मार्ग शोधत आहे.
इस्त्रायली लष्कराने वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांना ओलीस ठेवले
इस्रायली सैन्याने शनिवारी उत्तर गाझा येथील हॉस्पिटल कॉम्प्लेक्समधून माघार घेतली. मात्र त्यांनी पुन्हा एकदा हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. तसेच पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्त्रायली लष्कराने अनेक पुरुष वैद्यकीय कर्मचारी आणि काही रुग्णांना ताब्यात घेतले आहे.
हिजबुल्लाहने नवा प्रमुख निवडला
गाझाला पुरवठा होणाऱ्या जीवनावश्यक साधनांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इस्रायली संसदेने संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख एजन्सी UNRWA सोबत संबंध तोडण्याचे दोन कायदे मंजूर केले आहेत, ज्यामुळे अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा आव्हानात्मक ठरू शकतो. दरम्यान, लेबनॉनमधील हिजबुल्लाने त्यांच्या नेत्याच्या मृत्यूनंतर नईम कासिम यांची निवड केली आहे. हिजबुल्लाने इस्रायलवर हल्ले सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
हे देखील वाचा- Israel-Hezbollah War: हिजबुल्लाने निवडला नवा प्रमुख; कोण आहे नईम कासिम? जाणून घ्या