PM Balendra Shah: पंतप्रधान झाल्यानंतर चार महिन्यांतच नेपाळमधील तरुणांनी बलेंद्र शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत केले आंदोलन ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
जागतिक राजकारणातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेचे ढग दाटून आले आहेत. अवघ्या चार महिन्यांपूर्वी नेपाळच्या तरुणांनी आणि प्रामुख्याने ‘जनरेशन-जी’ने (Gen Z) ज्या युवा नेत्याला डोक्यावर घेतले होते, आज तोच नेता तरुणांच्या तीव्र संतापाचा बळी ठरत आहे. नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान बलेंद्र शाह (Balen Shah) यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप घेत हजारो तरुणांनी काठमांडूच्या रस्त्यांवर उतरून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू केली आहे. ‘रॅपर आणि इंजिनिअर ते देशाचे पंतप्रधान’ असा प्रवास करणाऱ्या बलेंद्र शाह यांच्यासाठी हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
काही महिन्यांपूर्वीच नेपाळमधील जुन्या राजकीय घराणेशाहीला आणि भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या तरुण मतदारांनी केपी शर्मा ओली यांच्या सरकारला सत्तेवरून खेचले होते. त्यानंतर राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (RSP) प्रमुख असलेल्या बलेंद्र शाह यांच्यावर देशाची धुरा सोपवण्यात आली. व्हीआयपी संस्कृती संपवणे, पारदर्शकता आणणे आणि तरुणांना रोजगार देणे अशा मोठ्या आश्वासनांच्या जोरावर शाह सत्तेत आले. परंतु, अवघ्या चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीतच त्यांचे सरकार सामान्य जनतेच्या आणि विशेषतः तरुणांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. केवळ रस्त्यावरील आंदोलकच नाही, तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातही (आरएसपी) अंतर्गत असंतोष उफाळून आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नेपाळमधील या ताज्या जनक्षोभाच्या मागे एक अत्यंत दुःखद आणि वेदनादायी घटना कारणीभूत ठरली आहे. काठमांडूमध्ये राहणारा २५ वर्षांचा तरुण गणेश नेपाळी हा एका ॲप-आधारित कंपनीत राइड-शेअरिंग चालक (Bike Rider) म्हणून काम करत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आणि परदेशात नोकरी मिळवण्यासाठी तो काठमांडूमध्ये धडपडत होता. एका पासपोर्ट कार्यालयाजवळ पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून काठमांडू महानगरपालिकेच्या पोलिसांनी त्याच्या मोटरसायकलचे चाक लॉक केले. यावरून पोलीस आणि गणेश यांच्यात तीव्र वाद झाला. वारंवार लावण्यात येणारा दंड आणि पोलिसांच्या जाचाला कंटाळून, अत्यंत व्यथित झालेल्या गणेशने स्वतःच्याच गाडीतील पेट्रोल काढून स्वतःला पेटवून दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BabElMandeb: ‘अश्रूंचे द्वार’ जागतिक अर्थव्यवस्थेला रडवणार? ‘बाब अल-मंदेब’ नाकेबंदीच्या इशाऱ्याने कच्च्या तेलाच्या बाजारात भूकंप
या आत्मदहनामध्ये गणेश नेपाळी ६० टक्क्यांहून अधिक भाजला गेला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेपाळमधील तरुणांचा संयम सुटला. कधीकाळी याच बलेंद्र शाह यांनी महापौर असताना एका सामान्य नागरिकाच्या आत्मदहनाला ‘राज्यव्यवस्थेचे अंतिम अपयश’ म्हटले होते. आज ते स्वतः पंतप्रधान असताना एका गरीब चालकाला आत्महत्या करावी लागल्याने, “आता हे कोणाचे अपयश?” असा थेट प्रश्न तरुण विचारत आहेत. या घटनेनंतर सरकारने ९ कलमी करार करून चौकशीचे आदेश दिले असले, तरी आंदोलक शांत होण्यास तयार नाहीत.
तरुणांच्या संतापाचे दुसरे मोठे कारण म्हणजे सरकारची अमानुष ‘बुलडोझर कारवाई’ ठरली आहे. एप्रिल महिन्यापासून काठमांडू महानगर आणि आसपासच्या भागात नदीकाठची अवैध बांधकामे हटवण्याची मोहीम राबवण्यात आली, ज्यामध्ये २,६०० हून अधिक घरे पाडण्यात आली. या टोकाच्या आणि घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे १५,००० हून अधिक गरीब आणि भूमिहीन लोक एका रात्रीत रस्त्यावर आले. कोणतीही ठोस पुनर्वसन योजना (Rehabilitation Scheme) न आखता वृद्ध, लहान मुले आणि महिलांना पावसाळ्यात उघड्यावर सोडण्यात आले.
#WATCH | Kathmandu: Subhash, a protester in Nepal, “The Gen-Z wants regulation, it wants freedom from corruption. We want change. So, we were protesting. We wanted to beat him (former PM K.P. Sharma Oli) up, but he has left for somewhere. He has left the country and run away. We… pic.twitter.com/lHfpH2pQBB — ANI (@ANI) September 10, 2025
credit – social media and Twitter
कीर्तिपूर येथील एका तात्पुरत्या निवारा केंद्रात राहणाऱ्या या बेघर लोकांच्या हक्कांसाठी जेव्हा सामाजिक कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने आवाज उठवला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अमानुष कारवाई केली. आंदोलक आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांवर ‘थर्ड-डिग्री टॉर्चर’ (अमानुष छळ) केले आहे. प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी वाहनांनी मीडिया हाऊसचे गेट अडवल्याचेही समोर आले आहे. या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे नेपाळमधील लोकशाही धोक्यात आल्याची भावना जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ChinaBiotech: वटवाघुळ झाले आता चीन माकडांच्या मागे! एकाची किंमत तब्बल ३० लाख रुपये; प्रयोगशाळेत घडतंय काहीतरी धक्कादायक?
नेपाळमध्ये बेरोजगारी हा नेहमीच सर्वात संवेदनशील विषय राहिला आहे. सप्टेंबर २०२५ मधील ‘जनरेशन-जी’च्या ऐतिहासिक आंदोलनावेळीही हाच मुख्य मुद्दा होता. तरुणांचा असा आरोप आहे की, बलेंद्र शाह यांच्या नव्या सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी किंवा नवीन रोजगार निर्मितीसाठी कोणतीही ठोस तरतूद केलेली नाही. परिणामी, पदवीधर तरुण आजही परदेशात मजुरी करण्यासाठी जाण्यास हतबल झाले आहेत.
दुसरीकडे, नेपाळमधील शेतकऱ्यांनीही सरकारच्या धोरणांविरोधात मोठे युद्ध पुकारले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांना (MNCs) फायदा पोहोचवण्यासाठी सरकार देशांतर्गत कृषी उत्पादनांऐवजी आयातीला प्राधान्य देत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आपल्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी काठमांडूच्या रस्त्यांवर टोमॅटो फेकून आंदोलन केले.
सुरुवातीला केवळ व्हीआयपी संस्कृती बंद करणे आणि फेसबुक-ट्विटरवर लोकप्रिय ठरणारे निर्णय घेणे बलेंद्र शाह यांच्यासाठी सोपे होते. परंतु, प्रत्यक्ष देश चालवणे, देशाची आर्थिक घडी बसवणे आणि संवेदनशील आंतरराष्ट्रीय प्रश्न हाताळणे हे केवळ भाषणबाजी किंवा रॅप गाण्यांपुरते मर्यादित नसते, याची जाणीव आता नेपाळच्या जनतेला झाली आहे. आश्वासनांचा फुगा फुटल्यामुळे चौफेर अडचणीत आलेले पंतप्रधान बलेंद्र शाह येत्या काही दिवसांत राजीनामा देतात की लष्कराच्या जोरावर हे आंदोलन दडपून टाकतात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






