मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ED) नीरव मोदी (Nirav Modi) समूह कंपन्यांच्या २५३ कोटी ६२ लाख रुपये किमतीची हाँगकाँगमधील (Hong Kong) मालमत्ता जप्त (Asset Forfeiture) केली. त्यात रत्ने, दागिने आणि बँक ठेवींचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली. या प्रकरणातील एकूण जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत २ हजार ६५० कोटी ७ लाख रुपये आहे.
नीरव मोदी समूहाच्या हाँगकाँगमधील कंपन्यांच्या काही मालमत्ता या हिरे, दागिने आणि खात्यांमधील ठेवींच्या रूपात होत्या. त्या मालमत्ता आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, २००२ (PMLA) कलमांतर्गत तात्पुरत्या जोडल्या गेल्या आहेत, असे ईडीकडून सांगण्यात आले.
मोदी सध्या ब्रिटनच्या (Britain) तुरुंगात असून त्याने पंजाब नॅशनल बँकेची (PNB) दोन अब्ज डॉलरची (सुमारे ६ हजार ४९८.२० कोटी रुपये) फसवणूक केल्याचा आरोप असून तो या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) या प्रकरणी चौकशी करत आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, ६ हजार ४९८.२० कोटी रुपयांच्या पीएनबी बँकेच्या फसवणूक प्रकरणात गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल नोंदवून तपास सुरू केला होता.