भारताकडे पाकिस्तानपेक्षा अधिक अण्वस्त्रे, अण्वस्त्रांच्या बाबतीत कोणता देश जास्त धोकादायक? वाचा संपूर्ण यादी (फोटो सौजन्य-X)
Nuclear Weapon India In Marathi : युद्ध म्हटलं की देशांकडे अण्वस्त्राची चर्चा सुरुच होते. जगातील अनेक देशांकडे अण्वस्त्र आहेत. यामध्ये रशिया, अमेरिका, भारत, पाकिस्तान, इस्त्रायल, चीन, फ्रान्स,उत्तर कोरिया आणि इंग्लंड या देशांचा समावेश आहे. अशातच जगात अण्वस्त्रांची शर्यत तीव्र होत आहे. SIPRI म्हणजेच स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अलीकडील अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान फक्त ९ देश अजूनही या शर्यतीत सहभागी आहेत आणि जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान सर्वांनी अण्वस्त्र आघाडीवर स्वतःला बळकट केले आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, फक्त रशिया आणि अमेरिकेकडे जगातील सुमारे ९० टक्के अण्वस्त्रे आहेत.
अमेरिका आणि रशिया वगळता यादीत ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्रायल यांचा समावेश आहे. अहवालानुसार, जगात एकूण १२ हजार २४१ अण्वस्त्रे होती. त्यापैकी ९ हजार ६१४ लष्करी साठ्यात होती. विशेष म्हणजे क्षेपणास्त्रे आणि विमानांसह सुमारे ३ हजार ९१२ अण्वस्त्रे देखील तैनात आहेत.
SIPRI चा अंदाज आहे की, चीनकडे किमान ६०० अण्वस्त्रे आहेत. अहवालानुसार, चीनने इतर कोणत्याही देशांपेक्षा आपला अण्वस्त्रांचा साठा अधिक वेगाने वाढवला आहे. निरीक्षकांच्या मते, चीनच्या वाढत्या अण्वस्त्रांच्या साठ्याचा भारतावरही परिणाम होईल. कारण बीजिंगचा जवळचा मित्र पाकिस्तान देखील आपल्या अण्वस्त्र कार्यक्रमाला गती देत आहे. SIPRI अहवालावर प्रतिक्रिया विचारली असता, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी एका मीडिया ब्रीफिंगमध्ये सांगितले की चीनला या अहवालावर कोणतीही टिप्पणी करायची नाही.