सीरियातील रक्तपाताचा कहर! एक हजाराहून अधिक मृत्यू, महिलांची नग्न परेड आणि हिंसाचाराने हैराण देश ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दमास्कस : सीरियात पुन्हा एकदा भीषण रक्तपात सुरू झाला असून, या हिंसाचारात आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. सीरियाच्या अंतरिम सरकारने माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांच्या समर्थकांवर थेट हल्ले चढवले आहेत. विशेषतः लताकिया आणि टार्टस या किनारी भागांत सीरियन सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून, असद समर्थक अलावाइट्स समुदायाला लक्ष्य केले जात आहे.
745 नागरिकांसह 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू
ब्रिटनस्थित सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्स (SOHR) संस्थेच्या अहवालानुसार, गेल्या दोन दिवसांतील हल्ल्यांमध्ये किमान 745 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 125 सरकारी सुरक्षा दलांचे जवान आणि 148 असद समर्थक मारले गेले आहेत. लताकिया शहराच्या आसपास वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आला असून, या भागात मोठ्या संख्येने अलावाइट्स समुदायाचे लोक राहतात.
हे देखील वाचा : तिबेटी उठाव दिन केवळ एक ऐतिहासिक घटना नसून स्वातंत्र्याच्या संघर्षाची आठवण आहे
अत्याचाराच्या भीषण घटना
या हिंसाचारात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण जग हादरले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अलावाइट महिलांची नग्न परेड काढण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एवढेच नाही, तर एका लहान मुलाला रायफल देऊन त्याच्याच कुटुंबातील सदस्यांना गोळ्या घालण्यास भाग पाडण्यात आल्याचे हृदय पिळवटून टाकणारे वृत्त समोर आले आहे.
‘रस्त्यावर उभं राहून गोळी झाडली’
लताकिया भागात सुरू झालेला हिंसाचार अचानक वाढला, जेव्हा असद समर्थक सैनिकांनी सीरियन सुरक्षा दलांवर हल्ला केला. हा भाग असद समर्थक अलावाइट अल्पसंख्याकांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यानंतर, सीरियन सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर अलावाइट नागरिकांची कत्तल सुरू केली. बनियास शहरातील एका प्रत्यक्षदर्शीने स्काय न्यूजला सांगितले, “सुरक्षा दलांनी लोकांना जबरदस्तीने रस्त्यावर उभे केले आणि नंतर त्यांच्यावर बेधडक गोळीबार केला.” यामध्ये कोणालाही सोडण्यात आले नाही. एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, त्याच्या 20 शेजाऱ्यांना निर्दयपणे ठार मारण्यात आले.
सामूहिक कबरीत मृतदेह दफन
हिंसाचार एवढ्या टोकाला गेला आहे की, मृतदेह पुरण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सामूहिक कबरी खणण्यात आल्या आहेत. वेधशाळेचे प्रमुख रामी अब्दुररहमान यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपर्यंत हिंसाचाराच्या घटना काहीशा मंदावल्या होत्या, पण तोपर्यंत शेकडो निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. सीरियन राज्य वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, किनारपट्टी भागातील प्रमुख रस्ते बंद करण्यात आले असून, सरकारी सैन्याने असद समर्थकांच्या ताब्यात असलेल्या बहुतांश भागांवर ताबा मिळवला आहे.
हे देखील वाचा : सीरियात पुन्हा गृहयुद्धाचा भडका; 70 जणांचा मृत्यू, लताकियामध्ये भीषण चकमक
सत्तांतरानंतरही देश अस्थिर
अल-जुलानी यांच्या नेतृत्वाखालील HTS गटाने डिसेंबर 2023 मध्ये बशर अल-असद यांना सत्तेवरून हटवले होते. त्यानंतर, असद यांनी रशियात आश्रय घेतला असून, त्यांचे समर्थक अजूनही सीरियात कार्यरत आहेत. नवीन सरकारने असद समर्थकांना सुरक्षा दलांवरील हल्ल्यांसाठी जबाबदार धरले आहे. सीरियात 2011 पासून सुरू असलेल्या गृहयुद्धात पाच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, लाखो लोक बेघर झाले आहेत. आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या हिंसाचारामुळे सीरियातील जनतेवर आणखी संकट कोसळले आहे.