भारताच्या कृतीला पाकिस्तान घाबरला आहे! संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीपूर्वी विनंती पाठवली. चर्चा बंद खोलीत व्हावी. ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India-Pakistan tensions : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानविरोधात कडवा पवित्रा घेतल्यानंतर आता पाकिस्तानने घाईघाईने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) बैठकीची मागणी केली आहे. भारताच्या निर्णायक प्रतिसादामुळे पाकिस्तानवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे, त्यामुळे आज (५ मे २०२५) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव चर्चेसाठी मांडण्यात आला.
पाकिस्तानने ही बैठक ‘बंद दरवाजामागे’ (Closed-Door Meeting) घेण्याची विनंती केली असून, ही चर्चा सार्वजनिक केली जाणार नाही. पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांमधील प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पहलगाम हल्ल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती संपूर्ण दक्षिण आशियात अस्थिरता निर्माण करू शकते आणि ही बाब आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे.”
२६ पर्यटकांचा बळी गेलेल्या पहलगाम हल्ल्याला पाकिस्तानातून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाचा थेट परिणाम मानले जात आहे. या हल्ल्यानंतर भारताने खालील ठळक निर्णय घेतले:
1. सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह रोखला
2. पाकिस्तानसाठी जारी सर्व व्हिसा तातडीने रद्द
3. इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील संरक्षण सल्लागारांना परत बोलावले
4. भारत-पाक व्यापार पूर्णतः बंद
या पावलांमुळे पाकिस्तानची आर्थिक आणि राजनैतिक कोंडी झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तान आता UNSC च्या अस्थायी सदस्यपदाचा आधार घेऊन, परिस्थिती आंतरराष्ट्रीय मंचावर उभी करण्याचा प्रयत्न करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात दाखल, एर्दोगान यांचे रणनीतिक पाऊल; काय असेल भारताचा डाव?
भारताच्या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, माहिती मंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यासह अनेक नेत्यांनी भारताविरुद्ध अण्वस्त्र युद्धाची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गौरी, गझनवी आणि अब्दाली क्षेपणास्त्रांची आठवण करून देत भारताला डरकाळ्या फोडल्या आहेत.
दुसरीकडे, पंतप्रधान शाहबाज शरीफ आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सतत “दहशतवादाशी आमचा संबंध नाही, चौकशी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हावी” असा राग आळवत आहेत. तथापि, भारताने त्याच्या भूमिकेत कोणताही बदल केला नाही आणि “दहशतवाद्यांच्या पाठराखणकर्त्यांशी कोणतीही चर्चा शक्य नाही” असा स्पष्ट संदेश दिला आहे.
पाकिस्तानच्या मागणीवर आज UNSC मध्ये बंद दरवाजामागे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. भारताने मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त करत “आतंरिक सुरक्षेचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याची गरज नाही” असे मत मांडले आहे. भारताच्या मते, हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी गटांचा कारनामा असून, जगाने त्यांच्या पाठीशी उभं राहू नये. भारताच्या प्रतिसादामुळे पाकिस्तान एकीकडे UNSC च्या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्याचे राजकारण करत आहे, तर दुसरीकडे आपल्यावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दबावापासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ल्यांचे सत्र सुरूच; आत्तापर्यंत देशाचे ‘इतके’ नुकसान
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केवळ निषेध नव्हे, तर कृतीतून उत्तर दिले आहे. यामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने UNSC च्या व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला असला तरी, भारताच्या ठाम भूमिकेमुळे आणि जागतिक स्तरावर दहशतवादाविरोधातील सहकार्यामुळे पाकिस्तानला फारसा पाठिंबा मिळण्याची शक्यता दिसत नाही.