तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानात दाखल, एर्दोगान यांचे रणनीतिक पाऊल; काय असेल भारताचा डाव? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Turkish warships in Pakistan : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. भारताकडून कठोर कारवाई होण्याची भीती सतत पाकिस्तानला भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने आश्रय घेत तुर्कीयेकडून लष्करी पाठबळ मागितले आहे, आणि त्यानुसार तुर्कीचे युद्धनौका ‘टीसीजी बुयुकाडा’ कराची बंदरात दाखल झाले आहेत.
पाकिस्तान नौदलाच्या जनसंपर्क महासंचालनालयाने (DGPR) दिलेल्या माहितीनुसार, कराची बंदरात पोहोचताच पाकिस्तानी नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तुर्की नौदलाच्या जहाजाचे उत्साहाने स्वागत केले. हे आगमन तुर्की-पाकिस्तान सागरी सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने घडले आहे.
भारताच्या वाढत्या दबावामुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर सामरिक साथीदार शोधण्याच्या हालचालींमध्ये व्यस्त आहे. विशेषतः पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून बदल्याची शक्यता उघडपणे व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, तुर्कीचा लष्करी पाठिंबा पाकिस्तानसाठी आश्वासक ठरत आहे.
टीसीजी बुयुकाडा हे युद्धनौके कराचीत दाखल झाल्याने तुर्की-पाकिस्तान सागरी भागीदारीच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. DGPRच्या मते, या युद्धनौकेच्या भेटीत तुर्की आणि पाकिस्तानच्या नौदल अधिकाऱ्यांमध्ये रणनीतिक चर्चा, अनुभवांची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्याचे मार्ग शोधले जाणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ल्यांचे सत्र सुरूच; आत्तापर्यंत देशाचे ‘इतके’ नुकसान
गेल्या काही वर्षांत तुर्की आणि पाकिस्तानमधील संरक्षण भागीदारी गंभीरपणे वाढली आहे. तुर्कीच्या संरक्षण कंपन्यांनी पाकिस्तानच्या Agosta 90-B वर्गाच्या पाणबुड्यांचे आधुनिकीकरण केले असून, त्याचबरोबर ड्रोन्स आणि इतर लष्करी उपकरणांचीही मोठी पुरवठा व्यवस्था उभारली आहे. संपूर्ण भागीदारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे संयुक्त लष्करी सराव. अलीकडेच संपन्न झालेल्या ‘Ataturk-XIII’ नावाच्या सरावामध्ये दोन्ही देशांच्या विशेष लढाऊ दलांनी सहभाग घेतला, ज्यामुळे त्यांच्या सामरिक कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर, तुर्कीचे राजदूत डॉ. इरफान नेझिरोग्लू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली, आणि तुर्की-पाकिस्तान संबंधांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पाया अधोरेखित केला. त्यांनी अंकाराकडून इस्लामाबादला मिळणाऱ्या पाठिंब्याचे राजनैतिक प्रतिज्ञापन केले. DGPRच्या अधिकृत निवेदनानुसार, कराचीत युद्धनौकेचे वास्तव्य ही केवळ नौदल पातळीवरील सहकार्याची बाब नसून, एक व्यापक धोरणात्मक भागीदारीचे प्रतिक आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचा ‘हा’ सिक्रेट एअरबेस म्हणजे पाकिस्तानच्या घशात अडकलेला काटा, का? ते जाणून घ्या
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानने आता नवे अंतरराष्ट्रीय समर्थन मिळवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. तुर्कीच्या युद्धनौकेचे आगमन हा पाकिस्तानसाठी सामरिक आधारबिंदू ठरण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, भारताच्या सर्जिकल स्ट्राइक किंवा हवाई कारवाईसारख्या संभाव्य उत्तरांची भीती पाकिस्तानला सतावत आहे. त्यामुळे तुर्कीसारख्या देशाशी वाढते सहकार्य हे आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्याचा पाकिस्तानचा युक्तिवाद असू शकतो. पण दुसरीकडे, तुर्कीचा उघड पाठिंबा भारत-पाकिस्तान तणावात नवीन भूकंप रेषा निर्माण करू शकतो, हे निश्चित. यामुळे संपूर्ण दक्षिण आशियात सामरिक संतुलन ढासळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.