Pakistani Major Moiz Abbas : २०१९ मध्ये भारताच्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडल्याचा दावा करणारे पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी मेजर मुईझ यांना दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेने ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपमधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या मुईझ यांच्या मृत्यूने पाकिस्तानच्या लष्करात खळबळ उडाली आहे. टीटीपीच्या दहशतवाद्यांनी घातपात करून केलेल्या हल्ल्यात मुईझ यांच्यासह लान्स नाईक जिब्रानुल्लाह हे दुसरे सैनिकही मृत्युमुखी पडले. ही घटना दक्षिण वझिरिस्तानमधील सरगोगा परिसरात घडली असून, पाकिस्तानच्या लष्करासाठी ही मोठी धक्का देणारी घटना ठरली आहे.
गुप्तचर माहितीनंतर ऑपरेशन, मात्र दहशतवाद्यांनी घातपात केला
मिळालेल्या माहितीनुसार, पाक लष्कराला या भागात टीटीपीच्या हालचालींबाबत विश्वसनीय गुप्तचर माहिती मिळाली होती. त्यानुसार, मेजर मुईझ आणि लान्स नाईक जिब्रानुल्लाह ऑपरेशनसाठी सरगोगा येथे दाखल झाले. मात्र, दहशतवाद्यांनी आधीच घात लावला होता. दोघे अधिकारी तिथे पोहोचताच गोळीबार करण्यात आला आणि मुईझ यांचा जागीच मृत्यू झाला. टीटीपीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हा हल्ला लष्कराच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्यासाठीच करण्यात आल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Axiom-4 mission Launch : आज राष्ट्रपुत्र शुभांशू शुक्ला इतिहास रचणार; 12 वाजता निघणार अंतराळ मोहीम
२०१९ च्या भारत-पाक संघर्षात झाला होता मुईझ प्रसिद्ध
मेजर मुईझ हे २०१९ मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील बालाकोट एअर स्ट्राईकनंतर प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पाकिस्तानने त्यावेळी दावा केला होता की विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना जिवंत पकडणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी मेजर मुईझ होते. या घटनेनंतर त्यांना पाकिस्तानमध्ये “हीरो” म्हणून पाहिले जात होते.
Pakistan Army’s Major Moiz Abbas killed by Pak Taliban (TTP) in South Waziristan today.
Moiz claim to fame was that he got the credit for “capturing” India’s Wing Commander Abhinandan Varthaman in February 2019. pic.twitter.com/2EKIf74cHr
— Incognito (@Incognito_qfs) June 24, 2025
credit : social media
लष्कराच्या कार्यक्षमतेवर उठले प्रश्न
या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. दक्षिण वझिरिस्तानसारख्या संवेदनशील भागात ऑपरेशन करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुरेसे संरक्षण का मिळाले नाही, यावर टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मेजर मुईझ यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी त्यांच्या बलिदानाचे स्मरण करत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Vitiligo Day : समाजातील कलंकाविरोधात आणि सौंदर्याच्या नव्या परिभाषेसाठी एक पाऊल
कुटुंबीय शोकाकुल, देशभरात हळहळ
पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मेजर मुईझ यांचे मूळ गाव चकवाल आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबात शोककळा पसरली असून, त्यांचे गावही शोकमग्न झाले आहे. दहशतवादी संघटनांचा वाढता प्रभाव, लष्कराच्या ढासळलेल्या गुप्तचर क्षमता आणि वाढती असुरक्षितता यामुळे पाक लष्कराला आता नव्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. टीटीपीसारख्या संघटनांकडून आता थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य केले जात असल्याने पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न अधिक गडद होत चालला आहे.
पाकिस्तानसाठी गंभीर आत्मपरीक्षणाचा क्षण
मेजर मुईझ यांची हत्या ही केवळ एका अधिकाऱ्याचा मृत्यू नसून, पाकिस्तानच्या लष्करी व्यवस्थेच्या असुरक्षिततेचा आरसा आहे. एकेकाळी विंग कमांडर अभिनंदन यांना पकडणाऱ्या अधिकाऱ्याचा अशा प्रकारे अंत होणे, हा पाकिस्तानसाठी गंभीर आत्मपरीक्षणाचा क्षण आहे.