Europe Tour 2026 : पंतप्रधान मोदी फ्रान्स-स्लोव्हाकिया दौऱ्यावर रवाना, G-7 शिखर परिषदेत होणार सहभागी; संरक्षण भागीदारीवर लक्ष केंद्रित करणार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
PM Modi Europe Tour June 2026 : जागतिक राजकारणात भारताचे स्थान दिवसेंदिवस किती मजबूत होत चालले आहे, याची प्रचिती देणारी एक मोठी घडामोडी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) शनिवार, १३ जून २०२६ रोजी त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा दोन देशांच्या युरोप दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या पाच दिवसीय दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदी फ्रान्स आणि स्लोव्हाकिया या देशांना भेटी देणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यात केवळ द्विपक्षीय संबंधच मजबूत होणार नाहीत, तर फ्रान्समध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित G-7 शिखर परिषदेत भाग घेऊन पंतप्रधान मोदी जागतिक आव्हानांवर भारताची भूमिका मांडतील. विकसनशील देशांचा म्हणजेच ‘ग्लोबल साऊथ’चा एक बुलंद आवाज म्हणून या परिषदेत भारताकडे पाहिले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची सुरुवात फ्रान्समधील सुंदर शहर ‘नीस’ (Nice) येथून होणार आहे. १४ जून रोजी ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होतील. भारत आणि फ्रान्सचे संबंध नेहमीच विश्वासाचे राहिले आहेत. या बैठकीत प्रामुख्याने संरक्षण सहकार्य आणि लष्करी क्षमता वाढवणे यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होईल. सध्याच्या काळात हिंद-प्रशांत (Indo-Pacific) आणि इतर सागरी क्षेत्रांमध्ये वाढलेली सामरिक स्पर्धा पाहता, दोन्ही देश आपली सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी एकत्र पावले उचलणार आहेत. याशिवाय, दोन्ही नेते ‘इंडिया इनोव्हेट्स’ (India Innovates) या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत, ज्यामध्ये भारत आणि फ्रान्समधील आघाडीचे स्टार्टअप्स आणि व्हेंचर कॅपिटल फंड एकत्र येऊन भविष्यातील तंत्रज्ञानावर काम करतील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Biolabs: अँथ्रॅक्स, इबोला अन् सार्स… 30 हून अधिक देशांत अमेरिकेच्या गुप्त ‘बायोलॅब्स’; तुलसी गबार्ड यांनी सत्य आणले जगासमोर
या दौऱ्याचा दुसरा आणि सर्वात ऐतिहासिक टप्पा म्हणजे पंतप्रधान मोदींची स्लोव्हाकिया भेट. १४ ते १६ जून दरम्यान पंतप्रधान मोदी स्लोव्हाकियाच्या दौऱ्यावर असतील. १९९३ मध्ये चेकोस्लोव्हाकियाचे विभाजन होऊन स्लोव्हाकिया हा स्वतंत्र देश बनल्यापासून, गेल्या ३३ वर्षांत या देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे संपूर्ण युरोपचे लक्ष लागले आहे. स्लोव्हाकियामध्ये पंतप्रधान मोदी तिथले पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांच्याशी थेट चर्चा करतील. या ऐतिहासिक भेटी दरम्यान भारत आणि स्लोव्हाकियामध्ये व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल क्षेत्र आणि रेल्वे निर्मिती यांसारख्या मोठ्या क्षेत्रांमध्ये नवीन करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.
Strengthening partnerships, advancing progress. PM @narendramodi has departed for the 2-nation visit to France and Slovakia. During the visit, PM will engage with the leadership of both countries. PM will inaugurate ‘Bharat Innovates’ event at Nice, participate in the G7 Summit… pic.twitter.com/GJV7K5aOG8 — Randhir Jaiswal (@MEAIndia) June 13, 2026
credit – social media and Twitter
आपल्या युरोप दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान मोदी पुन्हा फ्रान्सला परततील. १६ आणि १७ जून रोजी फ्रान्समधील ‘एव्हियान’ (Evian) येथे जगातील सर्वात शक्तिशाली अर्थव्यवस्था असलेल्या देशांची म्हणजेच G-7 शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भारत सदस्य नसला तरी, जागतिक राजकारणातील भारताचे वाढते वजन लक्षात घेऊन भारताला ‘विशेष आमंत्रित देश’ म्हणून बोलावण्यात आले आहे. येथे पंतप्रधान मोदी जागतिक शांतता, हवामान बदल, ऊर्जा सुरक्षा आणि अन्न साखळीतील अडथळे यांसारख्या गंभीर विषयांवर जगातील बड्या नेत्यांशी संवाद साधतील. या परिषदेत भारताची उपस्थिती हे सिद्ध करते की, जागतिक पातळीवर भारताच्या संमतीशिवाय आता कोणतेही मोठे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S. Jaishankar: इराण कनेक्शन की अमेरिकेचा हलगर्जीपणा? 3 भारतीय खलाशांचा मृत्यूवर जयशंकर यांनी रुबिओ यांना फटकारले
दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात, १८ जून रोजी पंतप्रधान मोदी पॅरिसला पोहोचतील. युरोपमधील सर्वात मोठा आणि मानाचा तंत्रज्ञान उत्सव समजल्या जाणाऱ्या ‘विवाटेक समिट’ (VivaTech Summit) मध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. येथे ते भारताच्या डिजिटल क्रांतीबद्दल आणि देशातील वेगाने वाढणाऱ्या स्टार्टअप इकोसिस्टिमबद्दल जगाला माहिती देतील. या दौऱ्याची सांगता पॅरिसमधील भारतीय समुदायाच्या (Diaspora) एका भव्य मेळाव्याने होण्याची शक्यता आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी त्यांना भारताच्या विकास प्रवासात भागीदार होण्याचे आवाहन करतील, ज्यामुळे भारत आणि युरोपमधील सांस्कृतिक व भावनिक बंध अधिक घट्ट होतील.






