पंतप्रधान नरेंद्र मोदी (ट्विटर)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. पोलंड दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत आहेत. रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असताना नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण समजला जात आहे. दरम्यान पोलंडमध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित केले. त्याआधी त्यांनी डोबरी महाराजांचे स्मारक, कोल्हापूर स्मारक येथे भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मोदींनी संबोधन करताना पोलंड आणि भारतातील नात्यावर भाष्य केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना, ”तब्बल ४५ वर्षानंतर भारतीय पंतप्रधानांनी पोलंड देशाचा दौरा केला आहे. माझ्या तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरूवातीलाच मला हे सौभाग्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे मी पोलंड सरकार आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानतो. २०२२ मध्ये युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्ही जे सहकार्य केले आहे, ते कुणीही विसरू शकत नाही. आम्ही या चांगल्या क्षणी पोलंडमधील कंपन्यांना मेक इन इंडियासोबत येण्यासाठी निमंत्रित करतो. कोणत्याही समस्येचे समाधान हे युद्धभूमीवर असू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्दोष लोकांचे बळी हे मानवतेच्या विरोधात आहे.”
Addressing the press meet with PM @donaldtusk of Poland. https://t.co/Jqqn27ZeJq
— Narendra Modi (@narendramodi) August 22, 2024
नरेंद्र मोदी पोलंड दौरा संपल्यानंतर युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. १९९२ नंतर भारतीय पंतप्रधान युक्रेन दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी विदेश मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनावर सांगितले होते की, ”पोलंड दौऱ्यानंतर मी झेलेन्स्की यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार युक्रेनला जाणार आहे. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला युक्रेन दौरा असणार आहे. द्विपक्षीय संबंध मजबूत होण्यासाठी मी राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहे. ”
दरम्यान, पोलंडमध्ये गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. भारतीय नागरिकांशी संवाद साधताना सभागृहामध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला. पोलंड येथे भारतीय नागिरकांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात थेट मराठीमध्ये केली. यावेळी सभागृहातील प्रेक्षकांचा आनंदोत्सव व जल्लोष ऐकू आला. याचा व्हिडिओ पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचाही आवर्जून उल्लेख केल्याचे देखील पाहायला मिळाले. तसेच पोलंड आणि कोल्हापूरचे खास कनेक्शनचा उल्लेख देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.