Iran-Israel War : इराण-इस्रायलमधील युद्ध थांबवण्यासाठी रशिया करणार सहकार्य; व्लादिमीर पुतिन म्हणाले...(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मॉस्को : गेल्या अनेक दिवसांपासून इराण-इस्त्रायल, अमेरिका या देशांत तणावाचे वातावरण आहे. इराणनेही आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहिला मिळत आहे. त्यातच आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावावर गंभीर चिंता व्यक्त केली आणि युद्धविरामाच्या गरजेवर भर दिला. “सध्याची परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची आहे, परंतु युद्ध थांबवणे आणि शांतता प्रस्थापित करणे हाच पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे”, असे पुतिन यांनी म्हटले आहे.
व्लादिमीर पुतिन यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, रशिया शांतता प्रक्रियेला पुढे नेण्यासाठी आणि या मुद्द्यावर शक्य त्या सर्व मार्गांनी मध्यस्थी करण्यास तयार आहे. इराणने कोणतीही चिथावणीखोर कृती केली नाही. एकेकाळी इराणच्या अणुकार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय एकमत होते आणि परिस्थिती नियंत्रणात होती, परंतु नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली.
दरम्यान, पुतिन यांनी सांगितले की, ते इराणी अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत संयम राखण्याचे सातत्याने आवाहन करत आहेत. मात्र, इराणचा दावा आहे की, त्यांच्यावर हल्ले होत आहेत आणि त्यांचे लोक मारले जात आहेत, ज्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्यास भाग पडत आहे. पुतिन यांनी मान्य केले की परिस्थिती अत्यंत संवेदनशील आणि गुंतागुंतीची असून, प्रत्येक बाजू आपापल्या सुरक्षेच्या चिंतांना सामोरे जात आहे.
रशियाचे आखाती देशांसोबत चांगले संबंध
रशियाचे आखाती देशांसोबत चांगले संबंध आहेत आणि सर्व पक्षांसोबत संवाद सुरू आहे. त्यांनी सांगितले की, इराण आणि अरब देश या दोन्हींसोबत रशियाचे असलेले मजबूत संबंध पाहता परिस्थिती समजून घेणे आणि संतुलित दृष्टिकोन स्वीकारणे महत्त्वाचे आहे. पुतिन यांनी सांगितले की, रशिया कोणत्याही शांतता चर्चेत किंवा मध्यस्थी प्रक्रियेत योगदान देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यांनी सांगितले की, जर रशियाला भूमिका बजावण्याची गरज पडली, तर तो मागे हटणार नाही.
ट्रम्प यांच्या युद्धविराम निर्णयाला पाठिंबा
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या आवाहनाचाही उल्लेख केला. पुतिन यांनी सांगितले की, हा निर्णय योग्य दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि यामुळे दीर्घकालीन शांतता प्रस्थापित होण्यास मदत होऊ शकते.






