Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार; पशुसंवर्धन विभागाची मोहीमफोटो सौजन्य: iStock
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये आढळणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष लसीकरण मोहीम राबविल्याने जिल्ह्यात लम्पी, घटसर्प, एकटांग्या आणि पायखुरीसारख्या आजारांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विभागाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजनाकेल्याने पशुधन सुरक्षित राहिले आहे. पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरण मोहीमेसाठी ३ लाखांहून अधिक डोजचा औषधसाठा जिल्ह्याला मिळाल्यावर तो सूक्ष्म नियोजन करून गावपातळीवर वितरित करण्यात आला होता. लसीकरण मोहिमेदरम्यान २ लाखाहून अधिक जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली.
घटसर्प हा पावसाळ्यात वाढणारा जीवघेणा आजार मानला जातो. जिल्ह्यातील गायी व म्हशींना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत १ लाख ३९ हजार ५३३ डोस देण्यात आले आहेत. लम्पी स्किन डिसीजवर नियंत्रणः अलीकडील काळात लम्पी स्किन डिसीजचा धोका वाढल्याने विभागाने व्यापक लसीकरण केले. गायींच्या अंगावर गाठी, ताप व अशक्तपणा निर्माण करणाऱ्या या आजारापासून संरक्षणासाठी ८४ हजार डोस जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी ८२ हजार ७०० डोस देण्यात आले आहेत. उर्वरित डोस आवश्यकतेनुसार वापरण्यात येत आहेत. शेळी-मेंढ्यांनाही लसीकरणः जिल्ह्यातील शेळ्या आणि मेंढ्या यांनाही पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात आले आहे. ‘पीपीआर’ (पेस्ट देस पेटिट्स रुमिनंट्स) प्रतिबंधक लसीचे १ लाख ५० हजार डोस उपलब्ध झाले.
एकटांग्या आजारामुळे जनावरांच्या पायांवर परिणाम होऊन ते लंगडू लागतात. हा आजार टाळण्यासाठी जिल्ह्यातील गायींना ‘बीक्यू’ (ब्लॅक क्वार्टर) प्रतिबंधक लस देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ७४ हजार १८४ डोस देण्यात आले. त्यामुळे संभाव्य संसर्गावर प्रभावी नियंत्रण मिळाले आहे.
जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) डॉ. जगदीश बुकतरे यांनी सांगितले की, “पावसाळ्यात जनावरांच्या गोठ्यांची स्वच्छता राखणे, आजारी जनावरे वेगळी ठेवणे, वेळेत लसीकरण करून घेणे आणि कोणतीही संशयास्पद लक्षणे दिसल्यास त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि व्यापक लसीकरण मोहिमेमुळे जिल्ह्यातील पशुधनाला संसर्गजन्य आजारापासून मोठा दिलासा मिळाला आहे.”






