४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड
वर्धा, ब्युरो : स्थानिक वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित येथील कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात गुंतवणूक केलेल्या नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन वर्धा जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे. ज्यांनी अद्याप परतफेडीसाठी आवश्यक अर्ज भरलेला नाही, अशा सर्व गुंतवणूकदारांनी उपलब्ध कागदपत्रांसह पुढील ७ दिवसात आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा येथे कार्यालयीन वेळेत हजर राहून माहिती सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच प्रभारी पोलिस उपअधीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धीरज खोब्रागडे व आर्थिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीचे पुरावे, पावत्या व इतर आवश्यक कागदपत्रांसह ७ दिवसांच्या आत आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
Wardha : पावसाची सर्वदूर संततधार ! आणखी २ दिवस बरसणार
२२ जुलै २०२२ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेने आरडी, एफडी तसेच इतर योजनांमध्ये आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर ठेवी स्वीकारल्या. मात्र, मुदत पूर्ण होऊनही गुंतवणूकदारांची ४ कोटी ५० लाख ५८ हजार ७६६ रुपये रक्कम परत न करता अपहार व फसवणूक केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी भीमराव ऊर्फ भीमा राजेंद्र शंभरकर (रा. समता नगर, वर्धा) यांच्याविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (५), ३१८(४) तसेच एमपीआयडी कायदा, १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
Wardha : भरपावसात गांधीगिरी ! पेपरफुटीवर काँग्रेसची आक्रमक भूमिका…
दरम्यान, या प्रकरणामुळे वर्धा जिल्ह्यातील ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाकडे आणि पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






