जगातील सर्वात सुरक्षित देशांची यादी जाहीर, आइसलँड सर्वात सुरक्षित; भारत कोणत्या क्रमांकावर? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Safest countries 2025 : जगात सुरक्षितता हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार मानला जातो. परंतु आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात हा अधिकार अनेक ठिकाणी धोक्यात आहे. या पार्श्वभूमीवर दरवर्षी “ग्लोबल पीस इंडेक्स” (GPI) अहवाल प्रसिद्ध केला जातो, ज्यात कोणते देश सुरक्षित, शांतताप्रिय आणि राहण्यायोग्य आहेत हे स्पष्ट होते.
२०२५ सालासाठीचा ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून, यात आइसलँडने पुन्हा एकदा जगातील सर्वात शांत आणि सुरक्षित देशाचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे, आइसलँड २००८ पासून म्हणजे सलग १७ वर्षांपासून या क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. हे त्यांच्या समाजरचनेतील विश्वास, कमी गुन्हेगारी दर आणि सैन्याच्या अभावाचे परिणाम असल्याचे मानले जाते.
ग्लोबल पीस इंडेक्समध्ये १६३ देश आणि प्रदेशांचा समावेश करण्यात आला असून ते जगाच्या एकूण ९९.७ टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. या यादीत भारताला ११५ वा क्रमांक मिळाला आहे. जरी भारताला पहिल्या १०० देशांमध्ये स्थान मिळवता आले नाही, तरीसुद्धा हा अहवाल भारतासाठी आशावादी ठरतो. कारण गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताचा जीपीआय स्कोअर ०.५८% ने सुधारला आहे. भारतातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती, दहशतवादावरील नियंत्रण, तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठीचे प्रयत्न यामुळे भारताची रँकिंग काही प्रमाणात उंचावली गेली आहे. इंडियन एक्सप्रेसनुसार, भारताचा जीपीआय स्कोअर २.२२९ वर नोंदवण्यात आला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indonesia Protests : 50 लाखांचा भत्ता अन् भडकली जनता; इंडोनेशियात अर्थमंत्र्यांच्या घरावर हल्ला, निदर्शनांना हिंसक वळण
ग्लोबल पीस इंडेक्स तीन महत्त्वाच्या घटकांच्या आधारे देशांचे मूल्यमापन करतो:
सामाजिक सुरक्षा आणि संरक्षण – गुन्हेगारी दर, विश्वासाची पातळी, राजकीय स्थैर्य.
देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संघर्ष – युद्ध, दहशतवाद, सीमावाद यांची तीव्रता.
लष्करीकरणाची पातळी – सैन्याची उपस्थिती, शस्त्रास्त्रांवरील खर्च.
या सर्व निकषांमध्ये आइसलँड, आयर्लंड, न्यूझीलंड, फिनलंड, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, सिंगापूर, पोर्तुगाल, डेन्मार्क आणि स्लोव्हेनिया हे देश अग्रस्थानी आहेत. युरोपातील बहुतेक देश या यादीत वरच्या क्रमांकावर आहेत, ज्यामुळे तिथल्या स्थैर्यपूर्ण समाजरचनेचे दर्शन घडते.
या उलट, सब-सहारन आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील देशांची स्थिती चिंताजनक असल्याचे अहवालात नमूद केले आहे. रशिया, युक्रेन, सुदान, काँगो आणि येमेन हे देश तळाशी असून, येथील युद्ध, दहशतवाद, राजकीय अस्थैर्य आणि नागरी संघर्ष हे प्रमुख कारण आहे. दक्षिण आफ्रिकेतही शांततेत मोठी घसरण दिसून आली आहे. तसेच बांगलादेश आणि पाकिस्तानमध्येही नागरी असंतोष आणि दडपशाहीमुळे परिस्थिती बिघडली आहे.
या अहवालात आणखी एक धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या मते, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जगभरातील संघर्षांची संख्या एवढ्या उच्च पातळीवर पोहोचली आहे. केवळ या वर्षातच तीन नवे युद्ध सुरू झाले आहेत. मात्र, जे देश आधीपासून शांततेत आहेत त्यांनी आपले स्थान बळकट राखले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Balochistan Protest: बलोचिस्तानमध्ये लोकशाहीची गळचेपी; कलम 144 लागू, पाकिस्तान सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न
भारत या यादीत ११५ व्या क्रमांकावर असला तरी परिस्थिती आशादायक आहे. लोकशाही, विविधतेचा स्वीकार, तसेच सामाजिक सौहार्द यामुळे भारत पुढील काळात या क्रमवारीत सुधारणा करू शकेल अशी अपेक्षा आहे. मात्र दहशतवाद, सीमावाद आणि अंतर्गत सामाजिक तणाव कमी करण्यासाठी अधिक ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.