Silva Slammed Trump:'ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती असू शकतात, पण जगाचे सम्राट नाहीत...', 'या' जागतिक नेत्याने केले मोठे भाष्य ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी ट्रम्पवर तीव्र टीका करत म्हटलं “ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असू शकतात, पण जगाचे सम्राट नाहीत.”
अमेरिकेने भारत व ब्राझीलवर तब्बल ५०% टॅरिफ लावले असून, सिल्वा यांनी हे राजकीय शत्रुत्व असल्याचं स्पष्ट केलं.
सिल्वा यांचा इशारा अमेरिकन जनतेलाच आता कॉफी व मांसासारख्या ब्राझिलियन उत्पादनांसाठी जास्त पैसे मोजावे लागणार.
Silva Slammed Trump : जागतिक राजकारणात कधी कधी एक वाक्य हजारो राजनैतिक चर्चांना जन्म देतं. तसंच घडलं आहे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलेल्या थेट टीकेमुळे. “ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असू शकतात, पण जगाचे सम्राट नाहीत” हे वाक्य फक्त एक प्रतिक्रिया नाही, तर आजच्या बदलत्या आंतरराष्ट्रीय व्यापार समीकरणांचं प्रतिबिंब आहे.
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने भारत आणि ब्राझीलवर तब्बल ५० टक्के कर (टॅरिफ) लादले. हा कर जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. भारत व ब्राझील दोन्ही देश जागतिक व्यापारात उगवते तारे मानले जातात. त्यामुळे या दोन्ही देशांवर थेट आघात म्हणजे ट्रम्प प्रशासनाचं धोरणात्मक पाऊल मानलं जातं. लुला दा सिल्वा यांनी या टॅरिफला केवळ आर्थिक नव्हे, तर “राजकीय शत्रुत्व” म्हटलं आहे. त्यांच्यामते, ट्रम्प यांचे संबंध ब्राझीलशी नाहीत तर बोल्सोनारोशी आहेत. यामुळे ब्राझील-अमेरिका संबंध अधिकच ताणले गेले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan Saudi deal: सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये मोठा संरक्षण करार; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पहिली प्रतिक्रिया आली समोर
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सिल्वा यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला “या करांचा फटका शेवटी अमेरिकन जनतेलाच बसणार आहे. कॉफी, मांस आणि इतर ब्राझिलियन उत्पादनांसाठी त्यांना दुप्पट खर्च करावा लागेल.” ब्राझील हा जगातील कॉफी उत्पादनाचा राजा आहे, तर मांस निर्यातीतही अग्रगण्य आहे. अशावेळी या उत्पादनांवर जास्त कर बसल्यास अमेरिकन ग्राहकांचे बजेट कोलमडणार हे उघड आहे.
एका प्रश्नावर की त्यांनी ट्रम्पशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न का केला नाही, त्यावर सिल्वा म्हणाले “मी कधीच फोन केला नाही कारण मला त्यांच्याशी कधी बोलायचं नव्हतं. ट्रम्प म्हणाले होते की ब्राझीलचे अध्यक्ष कधीही फोन करू शकतात, पण वस्तुस्थिती अशी होती की ट्रम्प प्रशासन संवाद साधण्यास तयार नव्हतं.” ही वाक्यं फक्त नाराजी दाखवत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मानवी संवादाचं महत्त्व अधोरेखित करतात. एका महाशक्तीच्या नेत्याने जर दुसऱ्या देशाशी ट्विटर-फेसबुक पोस्टद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर तो विश्वासार्ह कसा राहील? असा प्रश्न सिल्वा यांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केला आहे.
सिल्वा यांनी उघडपणे सांगितलं की ब्राझीलला टॅरिफविषयी माहिती थेट अमेरिकी प्रशासनाकडून नाही, तर ब्राझिलियन वर्तमानपत्रांमधून मिळाली. त्यांनी सांगितलं “संवाद करण्याचा हा योग्य मार्ग नाही. अशा महत्त्वाच्या निर्णयांबाबत थेट चर्चा होणं आवश्यक असतं. पण ट्रम्प प्रशासनाने सोशल मीडियाला प्राधान्य दिलं.”
सिल्वा यांची ही भूमिका केवळ ब्राझीलपुरती मर्यादित नाही. आज जगभरात मोठ्या देशांकडून छोट्या किंवा विकसनशील देशांवर लादल्या जाणाऱ्या करांमुळे नव्या जागतिक आर्थिक असमानता निर्माण होत आहे. सिल्वा यांचा हा आवाज म्हणजे त्या असमानतेविरुद्धचं प्रतिक आहे. ते स्पष्ट म्हणतात “ब्राझीलशी संबंध सुधारायचे असतील, तर राजकीय पूर्वग्रह बाजूला ठेवावे लागतील. अमेरिका फक्त स्वतःचा विचार करून जगावर सत्ता गाजवू शकत नाही. जग बदललं आहे, आता संवाद आणि समानतेच्या पायावर नवे संबंध उभे करावे लागतील.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Bill HR 5271: ट्रम्प वॉर्निंग! अमेरिकन काँग्रेसमधील ‘या’ नवीन विधेयकामुळे पाक अधिकाऱ्यांवर होणार कठोर कारवाई
ही परिस्थिती भारतासाठीही अनोखी नाही. कारण अमेरिकेने भारतावरही हेच ५०% टॅरिफ लादले आहे. म्हणजे ब्राझील आणि भारत हे दोन्ही देश एका सारख्या दडपशाहीला सामोरे जात आहेत. भविष्यात या दोन देशांची आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणांतर्गत मैत्री अधिक दृढ होऊ शकते, असं संकेत विश्लेषक देत आहेत. लुला दा सिल्वा यांची ट्रम्पविरोधी ही थेट प्रतिक्रिया आजच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या भविष्याला दिशा दाखवते. त्यांनी अमेरिकेला स्पष्ट संदेश दिला आहे जगाला सम्राटाची गरज नाही, तर समान भागीदारांची गरज आहे.