अमेरिकेच्या न्याय विभागात गोंधळ; डोनाल्ड ट्रम्पविरोधात आवाज उठवणाऱ्यांची बोलती बंद (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉशिंग्टन: राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प कोणत्या ना कोणत्या कारणावरुन चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या त्यांच्या आणखी एका निर्णयाने अमेरिकेच्या न्याय विभागात मोठी उलथापालथ सुरु आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याविरोधात खटले चालवणाऱ्या 12 हून अधिक लोकांना अचानक नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. यामुळे न्याय विभागात अंतर्गत संघर्ष उफाळला आहे. फक्त न्याय विभागच नाही तर इतर विभागातील लोकांवर देखील कारवाई सुरु आहे.
न्याय विभागात अंतर्गत संघर्ष सुरु
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालवणाऱ्या विशेष वकील जॅक स्मिथ यांच्या नेतृत्तवाखील असलेल्या वकिलांवर या कारवाईचा परिणाम होत आहे. कार्यवाहक अटॉर्नी जनरल जेम्स मॅकहेनरी यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, न्याय विभागात व्यापक फेरबदल सुरू आहेत. मात्र, सध्या बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची संपूर्ण यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
ट्रम्प विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई सुरु
ट्रम्प यांनी पुन्हा सत्ता मिळवल्यानंतर प्रशासनातील त्यांच्याविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. त्यांनी प्रशासनातील त्यांच्याविरोधात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेषतः न्याय विभागातील ट्रम्पविरोधी वकिल आणि अधिकाऱ्यांना हटवले आहे. यामध्ये काही अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात आले आहे, तर काहींनी स्वतःहून राजीनामा दिला आहे.
विशेष वकील जॅक स्मिथ हे ट्रम्प यांच्या विरोधात 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीतील गैरप्रकार आणि फ्लोरिडातील मालमत्तेतून सापडलेल्या गुप्त दस्तऐवजांबाबत चौकशी करत होते. त्यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालांमुळे ट्रम्प अडचणीत आले. मात्र, ट्रम्प यांच्या विजयानंतर या सर्व तपासांना अचानक पूर्णविराम देण्यात आला आणि जॅक स्मिथ यांना राजीनामा द्यावा लागला.
न्याय विभागावर नियंत्रण मिळवण्याची ट्रम्प यांची रणनीती
ट्रम्प प्रशासन न्यायविभागावर पूर्ण नियंत्रण मिळवणाटचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अनेक तज्ज्ञांनी केला आहे. ट्रम्प यांनी नवीन अटर्नी जनरल म्हणून पाम बॉन्डी यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात, “मी न्याय विभागाचा वापर राजकारणासाठी करणार नाही,” असे म्हटले आहे. मात्र, जॅक स्मिथ यांसारख्या ट्रम्पविरोधकांवर चौकशी करण्याची शक्यता नाकारली नाही. फक्त न्याय विभागतच नव्हे तर अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेत (USAID) मध्येही वरिष्ठ अधिकाऱ्यांना अचानक रजेवर पाठवण्यात आले आहे.
न्याय विभागातील या घडामोडी लोकशाही प्रक्रियेसाठी मोठा धोका असल्याचे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयांना अमेरिकेच्या कायदा आणि प्रशासन व्यवस्थेकडून कितपत पाठिंबा मिळतो आणि या बदलांचे भविष्यात काय परिणाम होतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.