अमेरिकन निवडणुकीत नवा वाद! ट्रम्प यांच्या गंभीर दाव्यांवर कमला हॅरिस यांचा थेट प्रहार; म्हणाल्या, 'स्वतःचे अपयश लपवण्यासाठी...' ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Trump US Elections Controversy : अमेरिकेतील आगामी मध्यावधी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिथले राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीबाबत केलेल्या एका नवीन आणि वादग्रस्त विधानामुळे देशात मोठी राजकीय खळबळ माजली आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, २०२० च्या निवडणुकीदरम्यान चिनी मतदारांचा डेटा हॅक करण्यात आला होता आणि या संपूर्ण डेटा चोरीच्या प्रक्रियेत रशिया तसेच इराणचा थेट सहभाग होता. ट्रम्प यांच्या या विधानानंतर अमेरिकेच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे.
माजी उपराष्ट्रपती आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या आघाडीच्या नेत्या कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. हॅरिस यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे केवळ स्वतःच्या प्रशासकीय अपयशांवरून आणि वाढत्या महागाईसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुका जवळ आल्या की पराभवाच्या भीतीने लोकांची दिशाभूल करणे हा ट्रम्प यांचा जुनाच डावपेच असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी लिहिले की, “२०२० ची निवडणूक कधीही चोरली गेली नव्हती, तर वस्तुस्थिती ही आहे की रिपब्लिकन पक्ष ती निवडणूक लोकांच्या मतांमुळे हरला होता.” ट्रम्प प्रशासनाकडून आणल्या गेलेल्या ‘सेव्ह ॲक्ट’ (SAVE Act) वरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली. हॅरिस यांच्या मते, हा कायदा म्हणजे सामान्य मतदारांचा आवाज दडपण्याचा आणि जनतेकडून त्यांची लोकशाही सत्ता हिरावून घेण्याचा एक सुनियोजित अजेंडा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NASA LHS1140b: ब्रह्मांडात आणखी एक जीवसृष्टी! 49 प्रकाशवर्षे दूर शास्त्रज्ञांना सापडली दुसरी पृथ्वी; Aliensच्या अस्तित्वाचा सुगावा
हॅरिस यांनी पुढे म्हटले की, ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य जनतेच्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा देशातील महागाई कमी करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. आता निवडणुकांमध्ये पराभव निश्चित दिसत असल्यामुळे, ते निवडणूक प्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जनतेने संपूर्ण निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास गमवावा आणि मतदानापासून दूर राहावे, हीच ट्रम्प यांची इच्छा आहे. जर अमेरिकन नागरिकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान केले, तर रिपब्लिकन पक्षाचा आणि या भ्रष्ट विचारसरणीचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Donald Trump यांच्या या दाव्यांवर केवळ कमला हॅरिसच नव्हे, तर संपूर्ण डेमोक्रॅटिक पक्ष आक्रमक झाला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांचा उल्लेख थेट ‘एक अपयशी नेता’ असा केला आहे. दुसरीकडे, सिनेटर्सनीही ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी म्हटले की, सध्या देशासमोरील महत्त्वाच्या आर्थिक प्रश्नांवर आणि सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याऐवजी ट्रम्प हे अजूनही ६ वर्षे जुन्या खोट्या कथा आणि अफवा पसरवण्यात व्यस्त आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्येष्ठ नेते हकीम जेफ्रीज यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत ट्रम्प यांना ‘८० वर्षांचे अपयशी’ आणि ‘वेडे राष्ट्राध्यक्ष’ अशा शेलक्या शब्दांत संबोधले. जेफ्रीज यांनी आरोप केला की, ट्रम्प यांच्या चुकीच्या धोरणांमुळेच अमेरिकेची आर्थिक स्थिती खालावली असून, ते देशाचे नेतृत्व करण्यास पूर्णपणे अयोग्य ठरले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Central Command हाय अलर्टवर! इराणकडे सर्व अमेरिकी सैनिकांची लोकेशन्स; मध्य पूर्वेतील अमेरिकेचे साम्राज्य धोक्यात
कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी या वादात ऐतिहासिक मुद्द्यांचा आणि एपस्टाईन फाईल्सचा (Epstein Files) संदर्भ देत ट्रम्प यांच्या चारित्र्यावर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. न्यूसम म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे सध्याच्या घडीला अमेरिकन लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी सर्वात मोठा आणि गंभीर धोका बनले आहेत. ट्रम्प यांची कार्यशैली ही लोकशाही तत्त्वांना धरून नसून, ती कायद्याच्या राज्याऐवजी एखाद्या ‘डॉनच्या राज्यासारखी’ (Rule of a Don) वाटत आहे. त्यांनी अमेरिकन जनतेला आवाहन केले की, अशा कोणत्याही हुकूमशाही प्रवृत्तीपुढे किंवा ‘वेड्या राजापुढे’ न झुकता लोकशाहीचे रक्षण करावे.
तसेच, ॲरिझोनाचे सिनेटर मार्क केली यांनी ट्रम्प यांच्या मानसिकतेवर टोला लगावला. केली यांच्या मते, ट्रम्प यांच्यासाठी एकच साधे समीकरण आहे जर ते निवडणूक जिंकले तर ती प्रक्रिया योग्य असते, आणि जर ते हरले तर ती संपूर्ण यंत्रणाच हेराफेरीची (Rigged) असते. हा दुटप्पीपणा आता अमेरिकन जनतेच्या चांगलाच लक्षात आला आहे.
सिनेटर जॉन ऑसॉफ यांनीही यावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, पराभवाच्या भीतीने ग्रासलेला एक हताश नेताच अशी विधाने करू शकतो. २०२० मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी जनतेचा कौल नाकारण्याचा प्रयत्न केला होता, तोच जुना प्रकार ते पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्यासाठी करत आहेत. दरम्यान, सिनेटर राफेल वॉर्नॉक यांनी उपरोधिक सल्ला दिला की, ६ वर्षे होऊनही ट्रम्प अजून आपला जुना पराभव विसरू शकलेले नाहीत, यावरून त्यांची मानसिक स्थिती स्पष्ट होते आणि यासाठी त्यांनी एखाद्या चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाची (Psychiatrist) मदत घेण्याची गरज आहे. एकूणच, या संपूर्ण वादामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण आता अत्यंत संवेदनशील वळणावर पोहोचले आहे.






