ट्रम्प पहिल्याच दिवशी 200 हून अधिक ऑर्डर करणार पास; जाणून घ्या 'परदेशी'साठी सीमा सील करणार का? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिलाच दिवस ऐतिहासिक बनवण्याच्या तयारीत आहेत. आज रात्री भारतीय वेळेनुसार 10.30 वाजता राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प 200 हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या करणार आहेत. यामध्ये अमेरिकेच्या सीमेवरील सुरक्षेपासून महागाई नियंत्रणापर्यंतच्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश असेल. एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.
सीमा सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रीय सीमा आणीबाणी जाहीर करतील. दक्षिणेकडील सीमावर्ती भाग सुरक्षित करण्यासाठी यूएस आर्मी आणि डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीला निर्देश देतील. बेकायदेशीर स्थलांतर रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट करण्यासाठी ट्रम्प प्रशासन विशेष टास्क फोर्स तयार करेल. यामध्ये FBI, ICE, CEA यांसारख्या महत्त्वाच्या एजन्सींच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
ट्रम्प प्रशासनाने हे स्पष्ट केले आहे की, बेकायदेशीर परदेशी लोकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात येणार आहे. यासोबतच, गुन्हेगारी टोळ्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यासाठी तातडीने पावले उचलली जातील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशी नौदलाला कराचीत बोलावून पाकिस्तान रचत आहे कट; जाणून घ्या बंगालच्या उपसागरावर का ठेवून आहे लक्ष?
मेक्सिको सीमेवरील भिंतीचे बांधकाम आणि इतर निर्णय
मेक्सिकोच्या सीमेवर भिंतीचे बांधकाम पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने ट्रम्प पुढाकार घेणार आहेत. तसेच, अमेरिकेत अनधिकृत स्थलांतर रोखण्यासाठी एजन्सींना आपत्कालीन अधिकार दिले जातील. या निर्णयामुळे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू केलेल्या मोहिमेला गती मिळेल आणि सीमा सुरक्षिततेबाबत कठोर धोरण राबवले जाईल.
हंटर बिडेन प्रकरणावर कारवाई
हंटर बिडेन लॅपटॉप प्रकरणाशी संबंधित 51 राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची सुरक्षा मंजुरी निलंबित करण्याचा महत्त्वाचा निर्णय ट्रम्प घेणार आहेत. या प्रकरणावर अधिक तपास करून ट्रम्प प्रशासनाने पारदर्शकता आणण्याचा निर्धार केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लॉबस्टर रोल, ग्रील्ड चिकन, क्रीम चीज आणि आईस्क्रीम’… जाणून घ्या ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर पाहुण्यांसाठीचा मेन्यू
इतिहासाला नवीन वळण देणारे निर्णय
ट्रम्प प्रशासनाने ‘अमेरिकास बे’ सारख्या ऐतिहासिक ठिकाणांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे अमेरिकन सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय गर्वाची पुनर्स्थापना होईल, असे ट्रम्प समर्थकांचे मत आहे.
अमेरिकन सरकारमध्ये सुधारणा आणि बळकटीकरण
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी निर्णयांना अमेरिकन सरकारमध्ये मूलभूत सुधारणा घडवण्याचा एक धोरणात्मक प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयांमुळे देशाच्या सार्वभौमत्वाची पुनर्स्थापना होईल आणि अमेरिकेतील जनता सुरक्षित व स्थिर भविष्यासाठी ट्रम्प प्रशासनाच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ आणि पुढील वाटचाल
डोनाल्ड ट्रम्प आज रात्री भारतीय वेळेनुसार राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पहिल्याच दिवशी 200 हून अधिक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षऱ्या करत, ते आपला दुसरा कार्यकाळ दमदारपणे सुरू करणार आहेत. या निर्णयांमुळे आगामी काळात अमेरिकेच्या राजकीय व आर्थिक धोरणांवर महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहेत.