फोटो सौजन्य: सोसल मीडिया
न्यूयॉर्क: अमेरिकेत आज होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. रिपब्लिकेन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमेक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात ही लढत आहे. या दोघांपैकी कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या निवडणूकीत भारताची एक वेगळी छाप दिसून आली. कारण यावेळी अमेरिकेतील निवडणुकीच्या बॅलेट पेपरवर भारतीय भाषा पाहायला मिळणार आहे.
बॅलेट पेपरवर इतर चार भाषांसह बंगाली भाषेचा समावेश
अमेरिकेने आगामी निवडणुकांसाठी न्यूयॉर्कमध्ये मतपत्रिकांवर बंगाली भाषेचा समावेश करण्यात येणार आहे. यामुळे जगभरातील भारतीय समुदायासाठी हा एक अभिमानाचा विषय ठरला आहे. न्यूयॉर्क सिटी बोर्ड ऑफ इलेक्शन्सचे कार्यकारी संचालक मायकेल जे. रायन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना आता चार अतिरिक्त भाषांमध्ये सेवा पुरवल्या जाणार आहेत. या भाषांमध्ये चिनी, स्पॅनिश, कोरियन आणि बांगला (बंगाली) या आशियाई भाषांचा समावेश असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेतील 47व्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी ही एक महत्वपूर्ण पायरी ठरणार आहे.
अमेरिकेत आशियाई भारतीय भाषांचा समावेश करण्याची मागणी मान्य
अमेरिकेत भारतातील अनेक समुदायांचे लोक वास्तव्यास आहेत. यामुळे देशात आशियाई भारतीय भाषांचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या बंगाली भाषिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन यावर एकमत झाले. आणि मतदान हक्क कायद्यांतर्गत दक्षिण आशियाई अल्पसंख्याकांना मदत करण्यासाठी बंगाली भाषेचा बॅलेट पेपरमध्ये समावेश करण्यात आला. अशा प्रकारे, मातृभाषेतून मतदारांना मत देण्याची सुविधा मिळणार असल्याने हा पाऊल जगभरातील भारतीय वंशाच्या लोकांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.
Our language is on New York’s ballot papers. pic.twitter.com/DgFy3slS5D
— Secular Bengali (@SecularBengali) November 4, 2024
अमेरिकेतील भारतीय समुदायांमध्ये आनंदाचे वातावरण
या निर्णयाने न्यूयॉर्कमधील भारतीय समुदायात विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या भाषेच्या वापरामुळे मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेत अधिक सहभाग घेण्याची इच्छा वाढेल. निवडणूक प्रक्रियेतील समावेशकता आणि बहुभाषिकता अधोरेखित करणारा हा निर्णय अमेरिकेत विविधता जपण्याच्या धोरणाचा उत्तम नमुना ठरला आहे.
भारतीय समुदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असून न्यूयॉर्कसारख्या महानगरात त्यांचा आवाज अधिक प्रभावी होणार आहे. या निर्णयामुळे भारतीयांनी त्यांच्या संस्कृतीची आणि भाषेची ओळख वाढवण्याची संधी मिळेल. बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) भारतीय भाषेचा समावेश हा जागतिक स्तरावर भारतीय अस्मितेचे प्रतीक ठरला आहे, ज्यामुळे भारतीयांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.
बॅलेट पेपर म्हणजे काय?
ही एक पारंपारिक पद्धत आहे. जगभरात अनेक वर्षांपासून मतपत्रिकेद्वारे मतदान पारंपरिक पद्धतीने केले जाते. मतदान केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना उमेदवारांची किंवा पक्षांची यादी असलेली मतपत्रिका दिली जाते. नागरिक आवडीच्या उमेदवारासमोर खूण करतात आणि नंतर ती दुमडून सुरक्षित मतपेटीत टाकतात. या मतपत्रिकेद्वारे मत नोंदवले जाते.