युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेने आधीच निर्बंध लावले लागू होते. त्यात आता मंगळवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या गॅस, कच्च्या तेलाच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्बंधामुळे रशियाला मोठा आर्थिक झटका बसेल असे म्हटले. मात्र, बायडन यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर काय परिणाम होतील, याची चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिकेकडून रशियाच्या तेल आयातीवर बंदी घातल्याचा परिणाम दरांवर होण्याची भीती आहे. रशिया हा जगभरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशापैकी एक आहे. जगभरात दररोज कच्च्या तेलाच्या 10 बॅरलचा पुरवठा होत असेल तर, त्यापैकी एक बॅरल रशियातील आहे. रशियाच्या उपपंतप्रधानांनी कच्च्या तेलाचे दर 300 डॅालर प्रति बॅरल इतकी होण्याचा अंदाज वर्तवला होता.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भारताला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे इंधन दरात मोठी वाढ होण्याची भीती आहे. इंधन दर वाढल्याने महागाईतही वाढ होण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमकुवत होण्याची भीती आहे. सरकारकडून लोककल्याणकारी योजनांवरील निधीत घट होण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकेने निर्बंध लागू केले असले तरी युरोपीयन देश कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूसाठी युरोपियन देश रशियावर अवलंबून आहेत. युरोपीयन देश अमेरिकेच्या या निर्बंधाला साथ देण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, युरोपीयन देशांनीदेखील रशियावर इंधन आयातीवर निर्बंध लागू केल्यास इंधन दराचा भडका उडणार आहे.