फक्त 35 शब्दात डोनाल्ड ट्रम्प घेणार शपथ; जाणून घ्या काय बोलतील?
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या 47व्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा लवकरच पार पडेल. ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड होणे हे अमेरिकेच्या राजकीय इतिहासातील एक दुर्मीळ आणि महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. यापूर्वी केवळ ग्रोवर क्लीवलँड हे एकमेव राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांनी एकदा निवडणूक हरल्यानंतर पुन्हा सत्तेवर जोरदार पुनरागमन केले होते. ट्रंप यांची ही राजकीय पुनरावृत्ती अमेरिकेच्या राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची शपथ
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ ही फक्त 35 शब्दांची असते. ही शपथ अमेरिकन संविधानाचा भाग असून संविधानाच्या मूळ विचारांचे प्रतीक मानली जाते. शपथविधीमध्ये राष्ट्राध्यक्ष असे म्हणतात की, “I do solemnly swear (or affirm) that I will faithfully execute the Office of President of the United States, and will to the best of my ability, preserve, protect and defend the Constitution of the United States.” (“मी सत्यनिष्ठेने शपथ घेतो (किंवा प्रतिज्ञा करतो) की, मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा निष्ठापूर्वक कार्यभार सांभाळीन आणि माझ्या सर्वोत्तम क्षमतेनुसार अमेरिकेच्या संविधानाचे संरक्षण, सुरक्षा आणि बचाव करीन.”)
शपथविधीचा अनोखा सोहळा
डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी यावेळी अमेरिकेच्या कॅपिटल हिल्सवरील कॅपिटल रोटुंडा या इनडोअर ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. जवळपास 40 वर्षांनंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी बंदिस्त जागेत होणार आहे. यापूर्वी 1985 मध्ये रोनाल्ड रीगन यांनी कडाक्याच्या थंडीत आपला शपथविधी इनडोअर घेतला होता. यावेळीही थंडीच्या तीव्रतेमुळे तसेच सुरक्षा कारणास्तव शपथविधी घरातील वातावरणात होणार आहे. ट्रम्प यांना शपथ अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी दिली जाणार आहे.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सध्याचे राष्ट्राध्य जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन व हिलेरी क्लिंटन, जॉर्ज बुश व लॉरा बुश तसेच बराक ओबामा हे या सोहळ्याला उपस्थित राहतील. मात्र, मिशेल ओबामा आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हैरिस यांची अनुपस्थिती दिसून येणार असल्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी अमेरिकेच्या राजकीय इतिहासात एक संस्मरणीय घटना ठरणार आहे.