देशात डिझेल टंचाईचा हाहाकार (Photo Credit- X) 
Business

देशात डिझेल टंचाईचा हाहाकार; ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प, दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन्....

देशात इंधन दरवाढ आणि डिझेल टंचाईमुळे ६० लाख व्यावसायिक वाहने जागच्या जागी ठप्प झाली आहेत. यामुळे देशाचे दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान होत असून पुरवठा साखळी धोक्यात आली आहे.

नितिन कुऱ्हे
  • देशात डिझेल टंचाईचा हाहाकार!
  • ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प
  • दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन् वाहतूक व्यवस्था कोलमडली

Diesel Shortage Commercial Vehicles News: इंधनाच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि देशातील निवडक पेट्रोल पंपांवर सुरू असलेला डिझेलचा तुटवडा यामुळे मालवाहतूक क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला आहे. डिझेल न मिळाल्यामुळे देशातील तब्बल ४० टक्के म्हणजेच सुमारे ६० लाख व्यावसायिक वाहने रस्त्यांच्या कडेला उभी राहिली आहेत. या अभूतपूर्व संकटामुळे वाहतूक क्षेत्राचे दररोज २१ अब्ज रुपयांचे (२१०० कोटी रुपये) प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी ट्रक चालकांना तासनतास वाट पाहावी लागत असून, यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. परिणामी, संपूर्ण देशांतर्गत व्यापारावर याचा अत्यंत विपरीत परिणाम होत आहे.

पेट्रोल पंपांवर 'नो स्टॉक'चे फलक; शहरांत वाहनांच्या लांबच लांब रांगा

डीझेलच्या प्रचंड टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांचे हाल टोकाला पोहोचले आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंतच्या बहुतांश पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा पूर्णपणे संपला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, अनेक पंपांवर रात्रीपासूनच वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागत आहेत, तर काही चालकांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. अनेक पेट्रोल पंप चालकांनी आपल्या पंपाबाहेर 'नो स्टॉक' चे फलक लावले आहेत. डीझेल मिळत नसल्याने प्रामुख्याने जड वाहने, ट्रॅक्टर आणि कमर्शियल गाड्यांच्या चालकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शहरांतील मुख्य महामार्गांवरील पंपांवर ट्रकांच्या रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पंप चालकांनी आता कॅन किंवा गॅलनमध्ये सुट्टे डिझेल देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

अस्तित्वाच्या लढाईत अडकले ट्रान्सपोर्टर्स

इंधनाच्या दरांमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या परिवहन उद्योगाची स्थिती आता अत्यंत बिकट झाली आहे. कोणत्याही ट्रकच्या एकूण परिचालन खर्चात एकट्या डिझेलचा वाटा तब्बल ५० ते ५५ टक्के असतो. एकीकडे डिझेलची टंचाई आणि दुसरीकडे टोल टॅक्स, विमा, टायर्स, मेंटेनन्स यांसारख्या खर्चात झालेली वाढ यामुळे ट्रान्सपोर्टर्स आता अस्तित्वाची लढाई लढत आहेत. इंधन उपलब्धतेमधील हा अडथळा थेट मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल सप्लाय चेन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर गदा आणत आहे.

अर्थव्यवस्था धोक्यात; ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसची चिंता

या गंभीर परिस्थितीवर 'ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस'चे (AIMTC) प्रमुख बल मलकीत सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे.

"इंधनाच्या दरात ही तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून आगामी काळात ते आणखी १५ ते २० रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने या परिस्थितीवर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, जेणेकरून आम्ही पुढील निर्णय घेऊ शकू. या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे प्रभावित होत आहे. मालवाहतूक ठप्प झाल्यामुळे छोट्या कारखान्यांपासून ते मोठ्या उद्योगसमूहांचे उत्पादन बंद पडण्याच्या मार्गावर आहे." — बल मलकीत सिंह, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस

१० दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ; सीएनजीही महागला

गेल्या अवघ्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीनुसार, पेट्रोलच्या किमतीत प्रति लीटर ८७ पैसे, तर डिझेलच्या किमतीत प्रति लीटर ९१ पैशांची वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीसोबतच सीएनजी (CNG) देखील प्रति किलो १ रुपयाने महागला आहे. या सातत्यपूर्ण दरवाढीमुळे आगामी काळात महागाईचा भडका उडण्याची आणि औद्योगिक कच्च्या मालाची पुरवठा साखळी पूर्णपणे खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Washim: पाणीटंचाईच्या संकटाआधीच प्रशासनाचा प्लॅन तयार! जलस्रोतांची तत्काळ पडताळणी करण्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकरांचे निर्देश

Seven Crore Fraud Case: सात कोटींच्या प्रकरणात नवा ट्विस्ट! विजापूरच्या ३३ कोटींच्या तक्रारीने तपासाला वेगळे वळण

आता PIN Code पातळीवर समजणार भारताची आर्थिक नाडी! Dun And Bradstreet व Mastercard चा नवा City Vitality Index; महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

NCP Support Delimitation Bill : इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट! शरद पवार गटाचा डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा

Latur : 'आरबीआयच्या पत्राचा नीट अभ्यास करा!' धीरज देशमुखांचा निलंगेकरांना सल्ला