बनावट सह्या, खोटे अर्ज करून खात्यातून कोट्यवधी काढले
बँक मॅनेजरसह पाच जणांविरुद्ध नळदुर्ग पोलिसात गुन्हा
बनावट सह्यांच्या आधारे फसवूणक
Axis Bank Fraud : बँकेतील व्यवहारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा तब्बल 7 कोटी 12 लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्नाटक राज्यातील विजापूर येथील अक्सिस बँकेच्या शाखेत बँक मॅनेजरच्या कथित संगनमताने बनावट सह्या, खोटे अर्ज आणि कागदपत्रांच्या आधारे खातेदाराच्या बँक खात्यातून 6 कोटी 40 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.
याशिवाय 72 लाख रुपये किमतीचे रोलर व पेव्हरचे सेन्सरही परत न केल्याने एकूण फसवणुकीचा आकडा 7 कोटी 12 लाखांवर पोहोचला आहे. याबाबत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी अक्सिस बँकेच्या विजापूर शाखेत हा प्रकार घडल्याची माहिती दिली आहे.
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील जालगेरी येथील संजू उमलू चव्हाण (वय 37) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बालाजी जळबा गायकवाड (रा. परळी, जि. बीड), रफकी उहमंद बंदबीसाब काने, मल्लिकार्जुन कोअ्टलगी, मौलाली नझरी आणि फैयाद पडवेगार (सर्व रा. विजापूर) अशी आरोपींची नावे आहेत.
15 फेब्रुवारी 2024 ते जून 2026 या कालावधीत बँक मॅनेजर फैयाद पडवेगार याच्या मदतीने फिर्यादीच्या बनावट सह्यांचे अर्ज देऊन दोन वेळा खात्याचा ई-मेल आयडी बदलण्यात आला. त्यानंतर धनादेश व आरटीजीएस अर्जांवर बनावट सह्या करून कागदपत्रांच्या आधारे खात्यातून 6 कोटी 40 लाख रुपये काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच 72 लाखांचे सेन्सरही परत केले नाहीत.
एवढ्या मोठ्या रकमेचे व्यवहार बनावट कागदपत्रांच्या आधारे कसे झाले, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी 25 नोव्हेंबर रोजी नळदुर्ग पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या कथित घोटाळ्याची संपूर्ण साखळी तपासातून उघड होण्याची अपेक्षा आहे.