मुख्य आरोपीसह पाच जणांना अटक
अडीच लाखांचे दागिने जप्त
१४ वर्षीय मुलीची सुखरूप सुटका
नाशिक : अवघ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा अपहार करून दागिने विक्री केल्याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसांनी मुख्य आरोपीसह एकूण पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अपहृत मुलीचा शोध घेऊन तिची सुखरूप सुटका केली. तसेच आरोपींकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणातील मुख्य आरोपी पंकज घनश्याम येवले (रा. संतोषी माता नगर, पिंपळगाव बसवंत) याने अल्पवयीन मुलीस फूस लावून तिचे अपहरण केले होते. त्यानंतर तिच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने परस्पर ताब्यात घेऊन अपहार करत विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. विविध दिशांनी तपास करत पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेतला आणि तिची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी मुख्य आरोपीकडून अपहारित सुमारे अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, या गुन्ह्यात पीडित मुलीस आश्रय देणाऱ्या अन्य चार जणांचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सहआरोपी करण्यात आले. या चौघांसह मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहायक पोलीस निरीक्षक भोर, आव्हाड तसेच हवालदार निलेश जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विकास वाळुंज, सागर धात्रक आणि प्रशांत उगले यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलीस करत आहेत.
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव काय आहे?
पंकज घनश्याम येवले (रा. संतोषी माता नगर, पिंपळगाव बसवंत) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी या कारवाईत किती किमतीचा मुद्देमाल जप्त केला?
आरोपीकडून सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे अपहारित सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले.
या प्रकरणात एकूण किती जणांना अटक करण्यात आली?
मुख्य आरोपीसह पीडित मुलीस आश्रय देणाऱ्या अन्य चार जणांना, अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे.