पुणे : पार्किंगमध्ये खेळणाऱ्या अल्पवयीन मुलींना इमारतीच्या गच्चीवर नेऊन त्यांचा लैंगिक छळ करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पाच वर्षे कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. पिंपरी-चिंचवड विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संजय एन. यादव यांनी अवघ्या सहा महिन्यांत सुनावणी पूर्ण करून लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत हा निकाल दिला आहे.
खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. एस. एम. चौगुले यांनी कामकाज पाहिले. सर्व पीडित मुली १२ वर्षांखालील असल्याने पोक्सो कायद्यातील तरतुदीनुसार आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने शिक्षेत सौम्यता दाखवण्याची विनंती केली.
निष्पाप मुली आरोपीवर विश्वास ठेवून गच्चीवर गेल्या होत्या. १२ वर्षांखालील मुलींवरील अशा गुन्ह्यांमध्ये कोणतीही दया दाखवता येणार नाही. त्यामुळे गुन्हेगारांना जरब बसण्यासाठी योग्य शिक्षा होणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली. आरोपीला लैंगिक छळाच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले, मात्र जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून त्याची निर्दोष सुटका करण्यात आली.
दंडाच्या रकमेतून एका पीडितेला चार हजार रुपये, तर इतर दोघींना प्रत्येकी दोन हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच पीडितांना शासकीय भरपाई देण्याबाबत पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने विचार करावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
मोशी प्रकरणात आरोपीला किती शिक्षा झाली?
आरोपी दिनेश चौधरी याला पोक्सो कायद्यांतर्गत 5 वर्षे कारावास आणि 8 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.
ही घटना नेमकी कधी आणि कुठे घडली?
ही घटना 8 मे रोजी मोशी येथील एका इमारतीत घडली होती. पार्किंगमध्ये खेळणाऱ्या मुलींना पाण्याची टाकी दाखवण्याच्या बहाण्याने आरोपीने गच्चीवर नेले होते.
पीडित मुलींना भरपाई मिळणार का?
हो. दंडाच्या रकमेतून एका पीडितेला 4 हजार रुपये आणि इतर दोघींना प्रत्येकी 2 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच शासकीय भरपाईसाठी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.