सौजन्य - नवराष्ट्र टीम 
क्राईम

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड बनावट चावीच्या मदतीने चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले आहे. चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.

ज्ञानेश्वर मोरे

पिंपरी : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड बनावट चावीच्या मदतीने चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.५० ते १२.१५ वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील संदीप हॉटेलसमोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर एक कार पार्क करण्यात आली होती. या कारचे दरवाजे बनावट चावीच्या साहाय्याने उघडून त्यामध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेण्यात आली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना तातडीने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक व्यक्ती बनावट चावीने कार उघडून ५० लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. पुढील तपासात फिर्यादीसोबत मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींपैकी चारुदत्त शिवाजी बेंडाले याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या मित्राला कारची बनावट चावी देऊन कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती दिली आणि चोरी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, व्यवसाय सुपरवायझर, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) आणि चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, बांधकाम व्यवसाय, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड आणि वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनेही तपास करण्यात आला.

Mumbai News : १६० चौ. फुटांच्या चाळीतून थेट ५०० चौ. फुटांच्या घरात! ५५७ कुटुंबांचे स्वप्न साकार; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वाटप

Baramati News: बारामतीत कऱ्हामाई नदी परिक्रमा आणि भव्य महाआरती; ५०० हून अधिक नागरिकांचा सहभाग

पुण्यात Taekwondo चा ‘सुवर्ण’ झंझावात; इंटरनॅशनल तायक्वांदोत भारताने राखले वर्चस्व

Girish Mahajan: सांगली-साताऱ्याचे पाणी मुंबईला देणार नाही! कोयना प्रकल्पावर गिरीश महाजनांचे मोठे विधान, कोयना पाणी योजनेवरून राजकीय चर्चा

पुण्यातील हल्ला प्रकरणावर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'गंभीर...'