नवऱ्याचा संतापजनक प्रकार!
पत्नीला गुंगीचे औषध देऊन ३ वर्षे अनोळखी पुरुषांकडून अत्याचार
६० हून अधिक गुन्ह्यांची कबुली
Crime News: पती-पत्नीच्या नात्यातील विश्वासाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अनोळखी पुरुषांकडून बलात्कार करून घेतल्याचा आरोप एका पतीवर करण्यात आला आहे. ब्रिटनमधील ग्रेटर मँचेस्टरमधील स्टॉकपोर्ट येथे हा प्रकार घडला. तब्बल तीन वर्षे हा प्रकार सुरू असल्याचे तपासातून समोर आले आहे. विशेष म्हणजे, पत्नीवरील बलात्कारचे फोटो आणि व्हिडिओ बनवून ते ऑनलाइन शेअर केल्याचाही पतीवर आरोप आहे. या प्रकरणात आरोपीने ६० हून अधिक गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सीएनएन आणि द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, पोलिसांनी जेव्हा पीडित महिलेला तिच्या पतीच्या कृत्याबद्दल सांगितले, तेव्हा तिला सुरुवातीला विश्वासच बसला नाही. पतीने तिला गुंगीचे औषध देऊन त्या अवस्थेत असताना अनोळखी पुरुषांना घरी बोलावल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पतीसोबत आपले नाते चांगले होते, आमचे मित्रमंडळ होते आणि आम्ही एकत्र कामही करायचो, असे सांगत तिने पोलिसांकडून काहीतरी चूक झाल्याची शक्यता व्यक्त केली.
पोलिसांनी तिला अत्याचाराचे व्हिडिओ पुरावे दाखवले. त्यावेळी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पुरुषांना आपण ओळखत नसल्याचे तिने स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही प्रकारच्या लैंगिक प्रयोगासाठी किंवा रोल-प्लेसाठी आपण स्वेच्छेने संमती दिली नव्हती, असेही तिने सांगितले. व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला मोठा मानसिक धक्का बसला.
अभियोक्त्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी पती २०२३ पासून ऑनलाइन माध्यमातून अनेक पुरुषांच्या संपर्कात होता. तो या पुरुषांना आपल्या घरी बोलावत असे. त्यानंतर पत्नी झोपेत किंवा बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले जात आहे. पोलिसांच्या तपासात आरोपीने सुरुवातीला दारूच्या नशेत असलेल्या पत्नीचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले. पुढे पत्नीला अत्याचारादरम्यान जाग येऊ नये, यासाठी त्याने तिला गुंगीची औषधे देण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. आरोपीने औषधांचा परिणाम आणि ती दारूसोबत घेतल्यास होणाऱ्या धोक्यांबाबत ऑनलाइन संशोधन केल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले.
या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने पत्नीवरील अत्याचाराचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ त्याने ऑनलाइन इतर पुरुषांसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. आरोपीने FabSwingers आणि Fabguys.com यांसारख्या वेबसाइट्सवर पुरुषांशी संपर्क साधला होता. त्यानंतर मेसेजिंग ॲप्सच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद सुरू होता.
आरोपीने आपल्या ऑनलाइन प्रोफाइलवर पत्नीबद्दल माहिती देत इतर पुरुषांना तिचे फोटो दाखवण्याची आवड असल्याचे लिहिले होते. पत्नीच्या सर्च हिस्ट्रीमध्ये गुंगीची औषधे आणि इतर औषधांशी संबंधित शोध आढळल्याचेही अभियोक्त्यांनी न्यायालयात सांगितले. मात्र, पीडित महिलेने आपण केवळ डॉक्टरांनी लिहून दिलेली उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची औषधे घेत असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणात मँचेस्टर येथील मिन्शुल स्ट्रीट क्राउन कोर्टात नऊ पुरुषांवर खटला सुरू आहे. यापैकी सात पुरुषांवर आरोपीच्या घरी जाऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर अन्य दोघांवर प्रत्यक्ष संपर्काशिवाय ऑनलाइन माध्यमातून अत्याचारांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे.
आठ पुरुषांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. तर नवव्या आरोपीने तीन आरोपांमध्ये दोषी असल्याची कबुली दिली असून एक आरोप नाकारला आहे. दरम्यान, मुख्य आरोपी पतीने बलात्कार, लैंगिक अत्याचार, गुंगीचे औषध देणे आणि खासगी छायाचित्रे शेअर करणे यांसह ६० हून अधिक गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती समोर आली.
पीडित महिलेची ओळख उघड होऊ नये, यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत पतीचे नावही गोपनीय ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणीत आरोपी पती साक्ष देण्याची शक्यता आहे. अनेक वर्षे ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीने पत्नीच्या संमतीशिवाय तिचे लैंगिक शोषण केल्याचा हा प्रकार ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.