आई तुळजाभवानी मालिकेत आता नवे महापर्व
चातुर्मास आता अंतिम टप्प्यात
तुळजाईच्या अष्टशस्त्रधारिणीचे संकेत
कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ या मालिकेत चातुर्मास अंतिम टप्प्यात आला असून भगवान विष्णुंनी दिलेले उत्तरदायित्व पूर्ण करण्याच्या टप्प्यावर दैवी महापर्वाच्या सुरुवातीचे संकेत मिळाले आहेत. हा संकेत तुळजाईच्या अष्टशस्त्रधारिणी महापर्वाचा आहे. मालिकेत आतापर्यंत देवी भक्ती आणि आसुरी शक्तीच्या संघर्षाचा प्रवास पाहायला मिळाल्यानंतर, आगामी भागांत कथानक एका मोठ्या संकटाच्या दिशेने वळताना दिसत आहे. देवलोकावर ओढवलेल्या या नव्या संकटामुळे मालिकेतील नाट्य अधिक तीव्र होणार आहे. हे संकट महिषासुर आणि देवीच्या महायुद्धाच्या दिशेने जाणार आहे.
या अष्टशस्त्रधारिणी महापर्वात नेमके काय घडणार याची उत्सुकता ताणणारा प्रोमो सध्या विशेष चर्चेत आहे. कथानकानुसार, दैत्यराज महिषासुराने देवी तुळजाभवानीच्या नकळत संपूर्ण देवलोकाविरुद्ध एक भयंकर षडयंत्र रचले आहे. या कटकारस्थानाची जाणीव करून देण्यासाठी योगनिद्रेतून जागे झालेले भगवान विष्णू देवी तुळजाभवानीला एका अज्ञात भयाण गुहेत घेऊन जातात.
गुहेतील अंधारात विष्णूंच्या हातातील तेजस्वी दैवी प्रकाशागोलामुळे आठ धूसर दगडी मूर्ती दिसू लागतात. हे दृश्य पाहून तुळजाई स्तब्ध होते आणि या षडयंत्राची गंभीरता तिला जाणवते. जर हे वास्तव असेल, तर केवळ देवलोकच नव्हे तर संपूर्ण सृष्टीचा अंत अटळ असल्याचा इशारा विष्णू देवीला देतात.
हे महिषासुराचे षडयंत्र काय आहे., ही गुहा इतके दिवस अज्ञात का होती, आठ धूसर दगडी मूर्ती नेमक्या कसल्या आहेत आणि यातून सृष्टीचा अंत अटळ असल्याचा संकेत का मिळतो आहे, या रहस्यांचा उलगडा मालिकेच्या आगामी भागात होणार आहे. तुळजाईच्या अष्टशस्त्रधारिणी महापर्वाचा हा भव्य प्रवास ‘आई तुळजाभवानी’ मध्ये पाहता येणार आहे.