50 KT आणि होर्डिंग्जचा मजेशीर किस्साहर्षद अतकरी साकारणार अभिजीत थोरातची भूमिका.
पात्राला तब्बल 50 ATKT; गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज!
'येतेच आता मी नांदायला' मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू.
प्रत्येक मालिकेचं यश हे तिच्या कथेसोबतच त्यातल्या कलाकारांच्या चांगल्या अभिनयावर पण अवलंबून असतं. कलाकारांची योग्य निवड आणि त्यांच्यातली चांगली केमिस्ट्री यामुळे मालिकेतला प्रत्येक सीन अजून खुलतो. अशाच एका भारी कलाकारांच्या टीमसोबत अभिनेता हर्षद अतकरी 'अभिजीत थोरात' या नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'येतेच आता मी नांदायला' मालिकेतली त्याची भूमिका आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आहे, आणि यानिमित्ताने त्याने मालिकेतले कलाकार, त्यांचा अनुभव आणि आपल्या भूमिकेबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
याबद्दल बोलताना हर्षद म्हणाला, "'येतेच आता मी नांदायला' मालिकेसाठी माझं कास्टिंग सगळ्यात शेवटी झालं. त्याआधीच बाकीचे सगळे कलाकार निवडले गेले होते. पण जेव्हा मी पूर्ण टीमला भेटलो, तेव्हा जाणवलं की इतकी तगडी कास्टिंग कोणत्याही शोला मिळणं हे त्या शोचं नशीबच आहे. सगळ्या कलाकारांची खूप छान भट्टी जमली आहे आणि मला खात्री आहे की सगळ्यांची कामं प्रेक्षकांना नक्की आवडतील."
"पूजाला मी आधीपासून ओळखत असलो, तरी तिच्यासोबत पहिल्यांदाच काम करतोय. ती खूप चांगली आणि गुणी अभिनेत्री आहे. अशा कलाकारांसोबत काम करायला नेहमीच मजा येते. त्यात आमचे सीन्स पण खूप धमाल आणणारे आहेत आणि ते प्रेक्षकांनाही नक्की आवडतील, याची मला खात्री आहे. उषा मॅम यांच्याबद्दल सांगायचं तर त्या एक मोठ्या कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करायला मिळणं हे मी माझं नशीब समजतो. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि प्रत्येक दिवशी मी काहीतरी नवीन शिकतोय."
"एक मजेशीर किस्सा सांगायचा तर, या शोमध्ये माझं पात्र खूप वेळा नापास झालेलं आहे. त्याला तब्बल 50 एटीकेटी लागल्या आहेत. एका सीनमध्ये आपल्या आईला सतत वाईट बोलणाऱ्या आजीला धडा शिकवण्यासाठी तो पूर्ण गावात स्वतःचे होर्डिंग्ज लावतो. पण ज्या गावात आम्ही शूटिंग करत होतो, तिथे शूटिंग संपल्यानंतरही हे होर्डिंग्ज कोणी काढलेच नाहीत. जवळपास दोन दिवस माझे नापास झालेले होर्डिंग्ज, माझ्या मोठ्या कटआऊटसह तसेच उभे होते!"