डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? लोकसभा-विधानसभेच्या जागा कशा वाढणार, कोणत्या राज्याला किती फायदा होणार?  (फोटो सौजन्य-X)
India

Delimitation Bill: डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? लोकसभा-विधानसभेच्या जागा कशा वाढणार, कोणत्या राज्याला किती फायदा होणार?

Delimitation Bill: सध्या देशभराच एकाच शब्दाची चर्चा आहे , ती म्हणजे डिलिमिटेशन... नेमकं या डिलिमिटेशनचा अर्थ आहे तरी काय? याचा कोणत्या राज्याला किती फायदा? तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या जागा कशा वाढणार? जाणून घ्या सविस्तर माहिती...

श्वेता झगडे
  • डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय?

  • लोकसभा-विधानसभेच्या जागा कशा वाढणार

  • कोणत्या राज्याला किती फायदा होणार?

Delimitation Bill: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत संविधानाच्या १३२ व्या दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमधील जागा ५० टक्क्यांनी वाढवण्याची तरतूद आहे. लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० पर्यंत नेण्याचा प्रस्ताव आहे. या बदलांमुळे देशातील निवडणूक व्यवस्थेचे स्वरूप बदलण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला माहितीय का? डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे काय? खासदार आणि आमदारांच्या जागा कशा ठरतात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया आणि राजकीय गणित.(Delimitation Bill)

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे नेमके काय?

मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी मतदारसंघांच्या सीमा नव्याने निश्चित करण्याची प्रक्रियेला म्हटलं जातं. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, कोणत्या गावाचा, शहराचा किंवा परिसराचा समावेश कोणत्या खासदार किंवा आमदाराच्या मतदारसंघात असेल, हे ठरवण्याच्या प्रक्रियेला परिसीमन म्हणतात, म्हणजेच डिलिमिटेशन असं म्हटलं जातं.

उदाहरणार्थ, एखाद्या विधानसभा मतदारसंघात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि दुसऱ्या मतदारसंघात तुलनेने कमी राहिली, तर मतदारांचे समान प्रतिनिधित्व राखण्यासाठी सीमांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण होऊ शकते. प्रक्रियेत लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, प्रशासकीय सीमा आणि मतदारसंघांची सलगता यांचा विचार केला जातो. अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांच्यासाठी राखीव मतदारसंघ निश्चित करण्याचे कामही परिसीमन प्रक्रियेत केले जाते.

मतदारसंघ पुनर्रचना कोण करते?

भारतात मतदारसंघ पुनर्रचनेची जबाबदारी स्वतंत्र आणि उच्चाधिकारप्राप्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाकडे असते. संसदेने केलेल्या कायद्यानुसार या आयोगाची स्थापना केली जाते. आयोगाचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश भूषवतात. मुख्य निवडणूक आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित राज्यांचे निवडणूक आयुक्तही या प्रक्रियेत सहभागी असतात. आयोग मतदारसंघांची पुनर्रचना करताना संबंधित आकडेवारीचा अभ्यास करतो. त्यानंतर प्रस्तावित सीमांबाबत सूचना आणि हरकती मागवून अंतिम निर्णय घेतला जातो.

लोकसभा आणि विधानसभेच्या जागा कशा ठरवल्या जातात?

भारतीय संविधानातील अनुच्छेद ८२ नुसार प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेतील जागांचे वाटप आणि मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी संसदेने कायदा करण्याची तरतूद आहे. अनुच्छेद १७० मध्ये विधानसभांच्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत तरतुदी आहेत. मात्र, ४२व्या आणि ८४व्या घटनादुरुस्त्यांमुळे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांच्या पुनर्रचनेवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. २००१ च्या जनगणनेनंतर मतदारसंघांच्या सीमा बदलण्याची मुभा देण्यात आली, मात्र एकूण जागांच्या संख्येतील बदल पुढील जनगणनेनंतर होणाऱ्या पुनर्रचनेपर्यंत स्थगित ठेवण्यात आला. आता केंद्र सरकारच्या नव्या प्रस्तावात २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीचा वापर करून मतदारसंघांच्या सीमा निश्चित करण्याची तरतूद आहे. त्याचबरोबर राज्यांमधील लोकसभेच्या जागांचे सध्याचे सापेक्ष प्रमाण कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

लोकसभेच्या जागा ५० टक्क्यांनी कशा वाढणार?

केंद्र सरकारच्या नव्या प्रस्तावातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याची तरतूद. सध्या लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ आहे. प्रस्तावानुसार लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामध्ये राज्यांसाठी ८१५ आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी ३५ जागांची कमाल मर्यादा प्रस्तावित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या राज्यात सध्या लोकसभेच्या २० जागा असतील, तर ५० टक्के वाढीनंतर त्या ३० होऊ शकतात. म्हणजेच प्रत्येक राज्याला समान टक्केवारीने जागा वाढवण्याचा प्रस्ताव आहे. या पद्धतीमुळे लोकसभेतील राज्यांचे सध्याचे परस्पर प्रतिनिधित्वाचे प्रमाण कायम ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

महिला आरक्षणाचाही मार्ग मोकळा होणार?

या संपूर्ण प्रक्रियेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे महिला आरक्षणाचा आहे. या नव्या प्रस्तावानुसार लोकसभा आणि राज्यांचा विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेच्या आणि विधानसभांच्या जागांमध्ये वाढ झाल्यानंतर महिलांसाठी राखीव जागांची अंमलबजावणी करण्याची योजना आहे. सरकारचे उद्दिष्ट २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत महिला आरक्षण लागू करण्याचे आहे. म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण या दोन्ही प्रक्रिया एकमेकांशी जोडलेल्या आहेत.

राखीव जागा कशा निश्चित होतात?

भारतीय संविधानातील अनुच्छेद ३३० आणि ३३२ नुसार लोकसभा आणि विधानसभांमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. या जागांची संख्या संबंधित राज्यातील SC आणि ST लोकसंख्येच्या प्रमाणानुसार निश्चित केली जाते. ज्या मतदारसंघांमध्ये संबंधित समुदायांची लोकसंख्या तुलनेने जास्त आहे, अशा क्षेत्रांचा विचार राखीव जागा निश्चित करताना केला जातो. परिसीमन आयोग या प्रक्रियेत लोकसंख्येची आकडेवारी आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करतो.

संसदेत विधेयक मंजूर होण्यासाठी किती मतांची गरज?

हे विधेयक संविधान दुरुस्तीशी संबंधित असल्याने त्याला मंजुरी मिळवण्यासाठी संविधानाच्या अनुच्छेद ३६८ नुसार विशेष बहुमताची आवश्यकता आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विधेयक मंजूर होण्यासाठी उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश सदस्यांचे समर्थन आणि सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येतील बहुमत आवश्यक असते. लोकसभेतील सर्व ५४० विद्यमान सदस्यांनी मतदान केले, तर दोन-तृतीयांश बहुमतासाठी ३६० मतांची आवश्यकता असेल. मात्र, मतदानावेळी उपस्थित सदस्यांच्या संख्येनुसार हा आकडा बदलू शकतो. त्यामुळे ३६० हा प्रत्येक परिस्थितीत लागू होणारा निश्चित आकडा नाही.

३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन

केंद्र सरकारने ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. लोकसभेचे कामकाज ३० नोव्हेंबरपासून, तर राज्यसभेचे कामकाज २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण आणि संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, एप्रिल २०२६ मध्ये यापूर्वी आणलेले संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत आवश्यक विशेष बहुमत मिळवण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे केंद्र सरकारने नव्या तरतुदींसह सुधारित विधेयक आणण्याची तयारी केली आहे.

एनडीएला घटनादुरुस्तीसाठी किती संख्याबळ आवश्यक?

या विधेयकाच्या मंजुरीसाठी सरकारला विरोधी पक्षांसह इतर प्रादेशिक पक्षांचे समर्थन मिळवावे लागणार आहे. एप्रिलमध्ये झालेल्या मतदानात ५२८ सदस्यांनी मतदान केले होते. त्यापैकी २९८ मते विधेयकाच्या बाजूने, तर २३० मते विरोधात पडली होती. आवश्यक दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने विधेयक मंजूर होऊ शकले नव्हते.

आता नव्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर सरकार पुन्हा एकदा संख्याबळाची जुळवाजुळव करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने ५० टक्के जागावाढीच्या अटीवर विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे. इतर पक्षांची भूमिका आणि संसदेतील अंतिम मतदान याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Ayushmann Khurrana: मुलाच्या अभिनयाने आई भारावली! ‘ये प्रेम मोल लिया’ पाहून आयुष्मान खुरानाच्या आईची भावुक प्रतिक्रिया

Amravati News: रब्बी हंगामात मका पिकाला शेतकऱ्यांची पसंती! पाणी, खर्चाच्या गणिताने बदलली पीक निवड

Political News : डिलिमिटेशन बिलाबाबत मनसेची भूमिका काय? बाळा नांदगावकर यांचा धारावी मोर्चातून अदानी समूहावर निशाणा

Upcoming Smartphones: नवीन स्मार्टफोन घेण्यापूर्वी थोडे थांबा! डिसेंबरमध्ये लॉंच होत आहेत हे दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या खास फीचर्स

Gold Silver Rate Hike : दोन दिवसांत सोनं- चांदीच्या दरांत मोठी उसळी! नेमक्या कोणत्या 5 कारणांमुळे वाढले दर