गुजरात एटीएसची वडोदरा जिल्ह्यात कारवाई
जरोद बसस्थानकाजवळ संशयिताला घेतले ताब्यात
आरोपी मूळचा आसामचा; दहशतवादी नेटवर्कचा तपास सुरू
Gujarat ATS : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई करत वडोदरा जिल्ह्यातून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून एके-47 रायफल आणि 23 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, आरोपीच्या संपर्कांचे आणि संभाव्य नेटवर्कचे धागेदोरे शोधण्याचे काम सुरू आहे.
गुजरात एटीएसला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वडोदरा जिल्ह्यातील जरोद पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहीम राबवण्यात आली. जरोद बसस्थानकाजवळ एटीएसच्या पथकाने सापळा रचून एका संशयित वाहनाला अडवले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये एके-47 रायफल आणि 23 काडतुसे आढळून आली. त्यानंतर पथकाने वाहनातील व्यक्तीला ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासात संबंधित व्यक्तीचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो मूळचा आसामचा रहिवासी असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. दरम्यान, एटीएसकडून आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. त्याच्याकडे ही शस्त्रे कुठून आली, गुजरातमध्ये त्याचे संपर्क कोणाशी होते आणि ही शस्त्रे कोणाला देण्यात येणार होती, याचा तपास केला जात आहे.
आरोपी एखाद्या मोठ्या कटाचा भाग होता की शस्त्रांची वाहतूक करण्यासाठी आला होता, याचाही तपास यंत्रणा करत आहेत. तो एकटाच कार्यरत होता की त्यामागे आणखी काही जणांचे जाळे आहे, हे शोधण्यावरही भर दिला जात आहे.
आरोपीचा मोबाइल फोन, त्याचे संपर्क आणि अलीकडच्या काळातील हालचालींची तपासणी केली जात आहे. या तपासातून संभाव्य नेटवर्क आणि शस्त्रांच्या पुरवठ्याची साखळी उघड होण्याची शक्यता आहे.