कर्करोगाचे निदान झाले की रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती, चिंता आणि भविष्याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यातही रक्ताच्या कर्करोगाचे (Blood Cancer) नाव ऐकताच अनेकांना हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, असा गैरसमज होतो. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आज अनेक प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगांवर प्रभावी उपचार उपलब्ध असून, योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अनेक रुग्ण दीर्घकाळ चांगले आयुष्य जगू शकतात. याविषयी डॉ. श्वेता लुंकड, कन्सल्टंट हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट आणि BMT फिजिशियन, M|O|C, स्वारगेट सविस्तर माहिती दिली आहे.
आपल्या शरीरात रक्तपेशी तयार करण्याचे काम अस्थिमज्जा (Bone Marrow) करते. यामध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्स तयार होतात. या पेशींच्या निर्मिती प्रक्रियेत अनियंत्रित बदल झाल्यास असामान्य पेशींची वाढ होऊ लागते. या पेशी निरोगी रक्तपेशांच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण करतात आणि त्यातून रक्ताचा कर्करोग होऊ शकतो.
ल्यूकेमिया (Leukaemia): यामध्ये अस्थिमज्जेमध्ये असामान्य पांढऱ्या रक्तपेशींची अनियंत्रित वाढ होते. त्यामुळे शरीराची सामान्य रक्तनिर्मिती आणि रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित होऊ शकते.
लिम्फोमा (Lymphoma): हा कर्करोग शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेतील लिम्फॅटिक पेशींमध्ये विकसित होतो. मानेमध्ये, काखेत किंवा जांघेत गाठी येणे हे त्याचे एक संभाव्य लक्षण असू शकते.
मल्टिपल मायलोमा (Multiple Myeloma): हा प्लाझ्मा पेशींमध्ये होणारा कर्करोग आहे. यामुळे हाडांमध्ये वेदना, हाडे कमकुवत होणे आणि मूत्रपिंडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
रक्ताच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अनेकदा सामान्य आजारांसारखी वाटू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. मात्र काही लक्षणे वारंवार दिसत असल्यास वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
सतत थकवा जाणवणे आणि अशक्तपणा येणे.
वारंवार ताप येणे किंवा संसर्ग होणे.
विनाकारण वजन कमी होणे.
रात्री खूप घाम येणे.
मानेमध्ये, काखेत किंवा जांघेत वेदनारहित गाठी येणे.
शरीरावर सहज निळे डाग पडणे किंवा रक्तस्राव होणे. हाडे आणि सांध्यांमध्ये सतत वेदना होणे.
त्वचा फिकट दिसणे किंवा श्वास लागणे, ही लक्षणे इतर अनेक आजारांमध्येही दिसू शकतात. त्यामुळे केवळ लक्षणांच्या आधारे रक्ताच्या कर्करोगाचे निदान करता येत नाही. योग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
रक्ताच्या कर्करोगाचे नेमके कारण प्रत्येक रुग्णामध्ये स्पष्टपणे सांगता येत नाही. पेशींमधील जनुकीय बदलांमुळे हा आजार विकसित होऊ शकतो. काही व्यक्तींमध्ये विशिष्ट जनुकीय किंवा आनुवंशिक परिस्थिती, पूर्वी घेतलेले काही कर्करोग उपचार, विशिष्ट रसायनांचा दीर्घकाळ संपर्क आणि किरणोत्सर्गाचा संपर्क यांसारखे घटक जोखीम वाढवू शकतात. मात्र रक्ताचा कर्करोग म्हणजे आनुवंशिक आजारच असे नाही. तसेच अनेक रुग्णांमध्ये कोणताही स्पष्ट जोखमीचा घटक आढळत नाही. त्यामुळे स्वतःला दोष देण्याऐवजी लक्षणे ओळखणे आणि वेळेवर वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे.
रक्ताच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी विविध वैद्यकीय तपासण्यांची मदत घेतली जाते. सुरुवातीला संपूर्ण रक्तचित्र (CBC) तपासणी केली जाते. यामध्ये लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सची संख्या तपासली जाते. गरजेनुसार पुढील तपासण्या केल्या जाऊ शकतात. पेरिफेरल ब्लड स्मिअर (Peripheral Blood Smear) बोन मॅरो बायोप्सी आणि अॅस्पिरेशन (Bone Marrow Biopsy and Aspiration) फ्लो सायटोमेट्री (Flow Cytometry) सायटोजेनेटिक आणि मॉलिक्युलर टेस्टिंग लिम्फोमाच्या संशयामध्ये लिम्फ नोड बायोप्सी आणि PET-CT स्कॅन या तपासण्यांमुळे कर्करोगाचा प्रकार, त्याची अवस्था आणि त्यानुसार कोणता उपचार योग्य ठरेल हे निश्चित करण्यास मदत होते. आधुनिक उपचारांमुळे रक्ताच्या कर्करोगावर मात करणे शक्य गेल्या काही वर्षांत रक्ताच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठी प्रगती झाली आहे.
पूर्वी मुख्यतः केमोथेरपीवर अवलंबून असलेल्या उपचारांमध्ये आता अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. केमोथेरपी (Chemotherapy): कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी किंवा त्यांची वाढ नियंत्रित करण्यासाठी औषधांचा वापर केला जातो. टार्गेटेड थेरपी (Targeted Therapy): कर्करोगाच्या पेशींमधील विशिष्ट जनुकीय किंवा जैविक बदलांना लक्ष्य करून उपचार केले जातात. इम्युनोथेरपी (Immunotherapy): शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला कर्करोगाच्या पेशींविरुद्ध लढण्यासाठी मदत केली जाते. CAR-T सेल थेरपी: काही विशिष्ट रक्ताच्या कर्करोगांमध्ये रुग्णाच्या रोगप्रतिकारक पेशींमध्ये बदल करून त्यांचा कर्करोगाशी लढण्यासाठी उपयोग केला जातो. बोन मॅरो किंवा स्टेम सेल ट्रान्सप्लांट (BMT): काही प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगांमध्ये उच्च मात्रेतील उपचारांनंतर निरोगी रक्तनिर्मिती पुन्हा सुरू करण्यासाठी स्टेम सेल प्रत्यारोपण केले जाते. प्रत्येक रुग्णासाठी उपचारांची निवड कर्करोगाचा प्रकार, आजाराची अवस्था, वय, एकूण आरोग्य आणि तपासण्यांचे निष्कर्ष यांवर अवलंबून असते.
रक्ताच्या कर्करोगावरील उपचार पूर्ण झाल्यानंतरही रुग्णाच्या आरोग्याची नियमित देखरेख करणे आवश्यक असते. उपचारांनंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पूर्ववत होण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासण्या, संतुलित आहार, पुरेशी विश्रांती आणि संसर्गापासून बचाव यांना महत्त्व द्यावे.
कुटुंबीयांचा भावनिक आधार आणि सकारात्मक दृष्टिकोनदेखील रुग्णाच्या रिकव्हरीच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावतात. उपचारांच्या काळात मानसिक ताण जाणवणे स्वाभाविक आहे. अशा वेळी डॉक्टरांशी संवाद साधणे आणि आवश्यकतेनुसार समुपदेशन घेणे उपयुक्त ठरू शकते.
रक्ताच्या कर्करोगाविषयी भीती नव्हे, जागरूकता महत्त्वाची! रक्ताचा कर्करोग हा गंभीर आजार असला तरी त्याचे निदान म्हणजे आयुष्य संपले असे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन औषधे, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटमुळे अनेक रुग्णांसाठी उपचारांच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
सततचा थकवा, वारंवार ताप, विनाकारण वजन कमी होणे किंवा असामान्य रक्तस्राव यांसारखी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर तपासणी, अचूक निदान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य उपचार घेणे हेच रक्ताच्या कर्करोगाविरुद्धच्या लढाईतील सर्वात महत्त्वाचे टप्पे आहेत.